राहुल गांधींची 'गांधीगिरी'; 'अवनी वाघिणी'च्या शिकारीवरून टोचले सरकारचे कान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 12:54 PM2018-11-05T12:54:19+5:302018-11-05T13:00:02+5:30
यवतमाळमधील अवनी (टी 1) या नरभक्षक वाघिणीला ठार केल्याप्रकरणी भाजपा सरकारवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. विरोध पक्षांसहीत भाजपाच्या मित्रपक्षांकडूनही अवनी मुद्यावर राजकारण सुरू होऊ लागलं आहे.
नवी दिल्ली - यवतमाळमधील अवनी (टी 1) या नरभक्षक वाघिणीला ठार केल्याप्रकरणी भाजपा सरकारवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. विरोध पक्षांसहीत भाजपाच्या मित्रपक्षांकडूनही अवनी मुद्यावर राजकारण सुरू होऊ लागलं आहे. मनेका गांधी, शिवसेनेनंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. महात्मा गांधी यांनी मांडलेला विचार ट्विट करत त्यांनी अवनी वाघिणीला ठार केल्याच्या प्रकाराचा निषेध राहुल गांधींनी नोंदवला आहे.
''देशात प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरुन देशाची महानता ठरते, असं महात्मा गांधी यांनी म्हटले होते... #Avni’, असे ट्विट करत त्यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.
The greatness of a nation can be judged by the way its animals are treated.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 5, 2018
Mahatma Gandhi#Avni
(अवनीला नाईलाजाने ठार करावं लागलं, मुनगंटीवारांचं मनेका गांधींना प्रत्युत्तर)
दरम्यान, या घटनेचा केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही निषेध नोंदवला आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत १३ जणांचा जीव घेणाऱ्या अवनी या नरभक्षी वाघिणीला महाराष्ट्र सरकारने बेकायदेशीररित्या ठार मारल्याचा गंभीर आरोप केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी केला व कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला. शार्प शूटर असगर अली याने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांच्या आदेशावरून अवनीच्या केलेल्या हत्येला मेनका गांधी यांनी पूर्णपणे बेकायदेशीर ठरवले. गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये वाघिणीच्या हत्येचे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रामुख्याने उपस्थित केले आहे.
गांधी म्हणाल्या की, वाघिणीला बेशुद्ध करून न पकडता थेट गोळी मारण्यात आली. वाघिणीच्या हत्येचे प्रकरण मी कायदेशीर, गुन्हेगारी व राजकीय प्रश्न म्हणून उपस्थित करील. या वाघिणीला यवतमाळ जिल्ह्यात दोन नोव्हेंबर रोजी गोळी घालून मारण्यात आले. गेल्या दोन वर्षांत अवनी १३ जणांच्या मृत्युला कारण ठरली. दहा महिन्यांपासून दोन बछड्यांची ती काळजी घेत होती. तिला राळेगाव हद्दीतील बोराटी जंगलात शूटर असगर अली याने गोळी घालून मारले. बेकायदा हत्या घडवण्यास असगर अली याचा वापर केला गेला, असे मेनका गांधी यांनी म्हटले. ज्या क्रूररितीने तिला ठार मारण्यात आले त्यामुळे मी खूप दु:खी आहे. अनेक पक्षांनी विरोध करूनही मुनगंटीवार यांनी तिला मारण्याचा आदेश दिला, असेही त्या म्हणाल्या.
नाईलाजाने ठार केले
‘अवनी’ वाघिणीला बेशुद्ध करून जिवंत पकडण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने वन कर्मचाºयांचा जीव वाचविण्यासाठी नाईलाजाने तिला ठार मारावे लागले. मंत्री आणि सचिव मुंबईत मंत्रालयात बसून वनांचे आणि वन्यजीवांचे रक्षण करत नाहीत. ते शेतकरी व अदिवासी करतात. त्यांच्यामध्ये खूप असंतोष होता. तो दूर केला नसता तर अखेरीस हेच लोक वन्यजीवांचे शत्रू झाले असते, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.