नवी दिल्ली: आताच्या घडीला देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची धूम आहे. पाच राज्यांपैकी पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड येथील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, उत्तर प्रदेशमधील काही टप्प्यांचे मतदान अद्याप बाकी आहे. सर्व राज्यांची मतमोजणी १० मार्च रोजी होणार आहे. यातच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्रातील मोदी आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने सर्वांत बेजबाबदार असल्याचा परिचय देशाला करून दिला आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.
काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना सोनिया गांधी यांनी मोदी आणि योगी सरकारवर हल्लाबोल केला. देशातील शेतकरी, युवक त्रस्त आहेत. सरकारी नोकरीतील १२ लाख पदे रिक्त असूनही सरकार भरती प्रक्रिया सुरू करत नाही. गेल्या ५ वर्षांपासून केवळ समाजात फूट पाडण्याशिवाय या सरकारने कोणतेही ठोस काम केले नाही, या शब्दांत सोनिया गांधी यांनी टीकास्त्र सोडले.
बेजबाबदार सरकार कसे असावे, याचे उत्तम उदाहरण
कोरोना संकटकाळात केंद्रातील मोदी आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने बेजबाबदार सरकार असे असावे, याचे उदाहरण देशासमोर ठेवले आहे. ऑक्सिजन आणि बेड्सची कमतरता, लसींचा तुटवडा, औषधांचा कमी साठा यामुळे देशवासींना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. तसेच पेट्रोल-डिझेल यासह गॅसची दरवाढ होत आहे. अशाने सर्वसामान्य जनतेच्या खिशावर मोठा बोजा पडत असून, घर चालवणे गरिबांसाठी कठीण होत चालले आहे, असा दावा सोनिया गांधी यांनी केला आहे.
दरम्यान, खासगीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना, देशातील गोरगरीब आणि सामान्य जनतेच्या कष्टावर उभ्या केलेल्या बड्या सरकारी कंपन्या कवडीमोलाने मोदी सरकार विकत आहे. यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे, असे टीकास्त्र सोनिया गांधी यांनी सोडले. यावेळी काँग्रेसने केलेल्या चांगल्या कामांचा आढावा सोनिया गांधी यांनी कार्यकर्त्यांसमोर घेतला.