नवी दिल्ली: काँग्रेसमध्ये लवकरच एक व्यक्ती, एक पद सूत्राची अंमलबजावणी केली जाऊ शकते. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी सध्या रणनितीकारांसोबत याविषयी चर्चा करत आहेत. याबद्दलचा निर्णय सोनिया गांधी लवकरच घेऊ शकतात. सध्या काँग्रेसमधील ६ मोठे नेते दोन-दोन पदांवर आहेत. या नेत्यांशी सल्लामसलत करुन सोनिया गांधी निर्णय घेतील, असं वृत्त 'आज तक'नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. स्वत: सोनिया गांधींकडे दोन पदं आहेत. काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदासह त्या पक्षाच्या संसदीय दलाच्या नेत्यादेखील आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्ष पदावरील सोनिया गांधी पक्ष संघटनेच्या प्रमुख आहेत. तर संसदीय दलाच्या नेत्या म्हणून त्या संसदेत पक्षाच्या प्रमुख आहेत. त्यामुळे सोनिया गांधींकडे दोन्ही पदं कायम राहतील, असं काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितलं. कोणत्या नेत्यांकडे एकापेक्षा अधिक पदं?-गुलाम नबी आजाद, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते, राष्ट्रीय महासचिव, प्रभारी- हरियाणा-सचिन पायलट- उपमुख्यमंत्री, राजस्थान आणि प्रदेशाध्यक्ष-नाना पटोले- अध्यक्ष, किसान मजदूर काँग्रेस आणि अध्यक्ष, प्रचार समिती (महाराष्ट्र)-नितीन राऊत- अध्यक्ष, अनुसूचित जाती विभाग-काँग्रेस आणि कार्यकारी अध्यक्ष (महाराष्ट्र)-उमंग सिंगार- कॅबिनेट मंत्री, मध्य प्रदेश सरकार आणि प्रभारी सचिव-कमलनाथ, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश आणि प्रदेशाध्यक्षहंगामी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यावर सोनिया गांधींनी काँग्रेस कार्यकारणीची बैठक घेतली. मात्र या बैठकीत नेत्यांमध्ये झालेला संवाद माध्यमांपर्यंत पोहोचला. यानंतर सोनिया गांधींनी बैठकीत मोबाईल न आणण्याचे स्पष्ट आदेश पक्षातील नेत्यांना दिले. शीला दीक्षित यांच्या निधनामुळे रिक्त झालेलं दिल्ली काँग्रेसचं अध्यक्षपद नेमकं कोणाकडे द्यायचं, असा प्रश्न सध्या सोनिया गांधींसमोर आहे. याशिवाय झारखंड, हरियाणा, महाराष्ट्रात पक्षाला सक्षम करण्याच्या आव्हानाच्या सामनादेखील त्यांना करावा लागणार आहे.
आता काँग्रेसमध्ये 'एक व्यक्ती एक पद'?; सोनिया गांधी मोठा निर्णय घेण्याच्या विचारात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 1:28 PM