Sonia Gandhi: “पक्षात एकजुट हवी, काँग्रेसचे पुनरुज्जीवन लोकशाही आणि समाजासाठी महत्त्वाचे”: सोनिया गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 04:21 PM2022-04-05T16:21:45+5:302022-04-05T16:23:24+5:30
Sonia Gandhi: काँग्रेसच्या विशाल संघटनेतील एकता प्रत्येक पातळीवर टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली: अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर काँग्रेस नेत्यांच्या अनेक बैठका पार पडल्या. काँग्रेसमधील नाराज गटाच्याही बैठका झाल्या. निवडणुकीतील पराभवावर काथ्याकूट करण्यात आला. यानंतर आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी संसदीय दलाच्या सभेत बोलताना काँग्रेसच्या पुढील वाटचालीबाबत भाष्य केले. पक्षात एकजुट हवी. काँग्रेसचे पुनरुज्जीवन लोकशाही आणि समाजासाठी महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन सोनिया गांधी यांनी यावेळी बोलताना केले.
सोनिया गांधी पुढे बोलताना म्हणाल्या की, पुढचा मार्ग आणखी कठीण आहे. पक्षाची निष्ठा, इच्छाशक्ती आणि प्रतिकाराची क्षमता पणाला लागणार आहे, असे सांगत काँग्रेसमधील असंतुष्ट जी-२३ नेत्यांच्या टीकेला कोणतेही उत्तर न देता सोनिया गांधींनी आपण आपल्या पक्षाची एकता टिकवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे नमूद केले.
चिंतन शिबिर घेणे महत्त्वाचे आहे
नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालांनंतर तुम्ही सगळे नाराज आहात हे जाणते. हे निकाल धक्कादायक आणि दुःखदायक होते. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीला भेटून कामकाजाचा आढावा घेतला. अन्य सहकाऱ्यांनाही भेटले. आपला पक्ष आणखी मजबूत कसा करायचा याबद्दल मला अनेक सूचनाही आल्या आहे. त्यापैकी अनेक सूचना या समर्पक आहेत आणि मी त्यावर काम करत आहे. चिंतन शिबिर घेणेही महत्त्वाचे आहे. कारण त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर सहकाऱ्यांच्या आणि पक्षाच्या प्रतिनिधींच्या सूचना जाणून घेता येतात, त्यांचे विचार समजावून घेता येतात. आपल्या पुढे येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठीचा मार्ग आणि त्यावर लगेच करायची कार्यवाही याबद्दल या सहकारी सांगतात, असेही त्या म्हणाल्या.
संघटनेची एकता टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे
पुढचा मार्ग आधीपेक्षाही कठीण असणार आहे. आपली निष्ठा, इच्छाशक्ती आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता या सगळ्याची आता परीक्षा असेल. त्यासाठी आपल्या या विशाल संघटनेची एकता प्रत्येक पातळीवर टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काँग्रेसचे पुनरुज्जीवन ही फक्त आपल्यासाठीच महत्त्वाची गोष्ट नाही तर ते लोकशाही आणि आपल्या समाजासाठीही महत्त्वाचे आहे, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.