काँग्रेसचे ११ राज्यांमधील ८० जागांवर मंथन; महाराष्ट्रावर चर्चा नाही; आज जाहीर होणार तिसरी यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 01:49 PM2024-03-20T13:49:58+5:302024-03-20T13:50:39+5:30
आतापर्यंत काँग्रेसने लोकसभेच्या ८२ जागांची घोषणा केली आहे.
आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत मंगळवारी तिसरी बैठक झाली. या बैठकीत ११ राज्यांतील ८० जागांवर चर्चा झाली. या जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. काँग्रेसकडून बुधवारी या ८० जागांची घोषणा होऊ शकते. आतापर्यंत काँग्रेसने लोकसभेच्या ८२ जागांची घोषणा केली आहे.
आजच्या बैठकीत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील लोकसभेच्या जागांबाबत चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरातही दिल्लीत दाखल झाले होते. मात्र, आजच्या बैठकीत महाराष्ट्रावर कोणतीही चर्चा झाली नाही. पुढील बैठकीत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाच जागांचा समावेश करण्यात येणार आहे.
देशाला बदल हवा आहे आणि या लोकसभा निवडणुकीत भाजप सरकारची ‘गॅरंटी’ ही २००४ मधील ‘इंडिया शायनिंग’सारखीच होईल. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा.
- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस
- काँग्रेसच्या न्यायपत्रात नेमके आहे काय?
- ‘युवा न्याय’ - ३० लाख सरकारी नोकऱ्या व तरुणांना एक वर्षासाठी प्रशिक्षणार्थी कार्यक्रमांतर्गत १ लाख रुपये.
- ‘सामायिक न्याय’ - जातनिहाय जनगणना करण्याची तसेच आरक्षणाची ५० टक्के मर्यादा काढून टाकण्याची ‘हमी’.
- ‘शेतकरी न्याय’ - किमान आधारभूत किमतीला कायदेशीर दर्जा, कर्जमाफी आयोगाची स्थापना आणि जीएसटीमुक्त शेती.
- ‘कामगार न्याय’ - कामगारांना आरोग्याचा अधिकार, किमान वेतन ४०० रुपये प्रतिदिन आणि शहरी रोजगार हमी.
- ‘महिला न्याय’ - गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला एक लाख रुपये देणार.
जाहीरनामा मंजुरीचे अधिकार
काँग्रेस कार्यकारिणीने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा मंजूर करण्याचे अधिकार दिले. हा जाहीरनामा नसून ‘न्याय पत्र’ असेल, असेही पक्षाने सांगितले. भागीदारी न्याय, शेतकरी न्याय, महिला न्याय, कामगार न्याय आणि युवा न्याय यांचा समावेश आहे. ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काँग्रेसचा जाहीरनामा तयार केला आहे.