येडियुरप्पांकडून भाजपा नेत्यांना 1800 कोटींची लाच, काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 08:52 AM2019-03-23T08:52:08+5:302019-03-23T09:06:09+5:30
कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांना तब्बल 1800 कोटींची लाच दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
नवी दिल्ली - कर्नाटकातीलभाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांना तब्बल 1800 कोटींची लाच दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने माध्यमामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचा हवाला देऊन हा गंभीर आरोप केला आहे. नवनियुक्त लोकपालांकडे सोपवण्यासाठी हे आदर्श प्रकरण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत काँग्रेसने या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी केली आहे.
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी येडियुरप्पा यांच्या डायरीत 1800 कोटींच्या वाटपाचा तपशील आहे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोर येऊन स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे ही डायरी आयकर विभागाच्या ताब्यात 2017 पासून असूनही पंतप्रधान मोदी यांनी त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले नसल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला आहे. काँग्रेसने केलेल्या या आरोपांनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाचे सारे चौकीदार चोर असल्याचा आरोप ट्वीटरद्वारे केला. भाजपाने हे आरोप फेटाळून लावले असून, येडियुरप्पा यांनी हा दस्तावेज बनावट असल्याचा दावा केला आहे. एका मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाच्या आधारे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसने हे आरोप केले आहेत. केंद्रीय विधी व न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवकुमार यांच्या घरी घातलेल्या धाडीत आयकर अधिकाऱ्यांना डायरीच्या झेरॉक्स मिळाल्या होत्या, असा दावा केला आहे.
Randeep Surjewala,Congress: Is it true or false? The diary with BS Yeddyurappa's sign on it was with the Income Tax Department since 2017. If that is the case why did Modi ji and BJP did not get it investigated? https://t.co/mzQV53tp00
— ANI (@ANI) March 22, 2019
'कर्नाटकात लोकसभेच्या 22 जागा जिंकल्या तर 24 तासांच्या आत भाजपाचे सरकार'
कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी काही दिवसांपूर्वी कर्नाटकात लोकसभेच्या 22 जागा जिंकल्यास भाजपाचे सरकार 24 तासांच्या आत सत्तेवर येईल असा दावा केला होता. यारागट्टी गावात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी येडियुरप्पा यांनी असं म्हटलं होतं. येडियुरप्पा यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईचा फायदा पक्षाला होईल असे म्हटले होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केल्यानंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनाची लाट आली आहे. याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत दिसून येणार आहे. तसेच या कारवाईमुळे कर्नाटकात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 22 हून अधिक जागा जिंकण्यास मदत होईल, असे बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले होते.