नवी दिल्ली - कर्नाटकातीलभाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांना तब्बल 1800 कोटींची लाच दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने माध्यमामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचा हवाला देऊन हा गंभीर आरोप केला आहे. नवनियुक्त लोकपालांकडे सोपवण्यासाठी हे आदर्श प्रकरण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत काँग्रेसने या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी केली आहे.
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी येडियुरप्पा यांच्या डायरीत 1800 कोटींच्या वाटपाचा तपशील आहे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोर येऊन स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे ही डायरी आयकर विभागाच्या ताब्यात 2017 पासून असूनही पंतप्रधान मोदी यांनी त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले नसल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला आहे. काँग्रेसने केलेल्या या आरोपांनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाचे सारे चौकीदार चोर असल्याचा आरोप ट्वीटरद्वारे केला. भाजपाने हे आरोप फेटाळून लावले असून, येडियुरप्पा यांनी हा दस्तावेज बनावट असल्याचा दावा केला आहे. एका मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाच्या आधारे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसने हे आरोप केले आहेत. केंद्रीय विधी व न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवकुमार यांच्या घरी घातलेल्या धाडीत आयकर अधिकाऱ्यांना डायरीच्या झेरॉक्स मिळाल्या होत्या, असा दावा केला आहे.