Video - 'लडकी हूं, लड सकती हूं' कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्ते भिडले, एकमेकांसोबतच लढले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 10:53 AM2021-12-29T10:53:23+5:302021-12-29T11:00:28+5:30
Congress Video : काँग्रेस कार्यकर्त्यांचा आपआपसात हाणामारी करत असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर आली आहे. असं असतानाच भाजपा आणि विरोधी पक्षाकडून प्रचारसभा आणि दौऱ्यांना सुरुवात झाली आहे. राजकारण तापलं आहे. याच दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांचा आपापसात हाणामारी करत असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे.
उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे 'लडकी हूं, लड सकती हूं' या कार्यक्रमाअंतर्गत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येच मारामारी झाली. या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्ते भिडले आणि एकमेकांसोबतच लढले. एका छोट्याशा गोष्टीवरून वाद सुरू झाला आणि पुढे तो विकोपाला गेला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांवर थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या खुर्च्या फेकल्या. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.
कार्यक्रम “लड़की हूँ लड़ सकती हूँ” का था
— Mrityunjay Kumar (@MrityunjayUP) December 27, 2021
लेकिन आगरा में आपस में ही लड़ पड़े कांग्रेस के कार्यकर्ता। 🙏🏽😅 pic.twitter.com/q1V9mp8wxh
मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील सूरसदन सभागृहामध्ये काँग्रेसकडून महिलांसाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी दिलेल्या 'लडकी हूं, लड सकती हूं' या नाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महिला कार्यकर्त्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्तेच एकमेकांना भिडले. काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना खुर्च्यांनी मारत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.
काँग्रेस कार्यकर्ते कार्यक्रमात भिडले; एकमेकांच्या जीवावर उठले
‘लडकी हूं, लड सकती हूं’मोहिमेअंतर्ग झालेल्या या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या शेकडो महिला कार्यकर्त्या आणि तरुणी सहभागी झाल्या होत्या. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेटा डिसूझा, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या अलका लांबा यांच्यासहीत अभिनेत्री आणि महिला नेत्या काम्या पंजाबी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रम संपून कार्यकर्त्या बाहेर पडत असतानाच अचानक कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि हाणामारी सुरू झाली. हा वाद नक्की कशावरुन झाला, कार्यकर्त्यांमध्ये दोन गट कशामुळे पडले याची माहिती समोर आलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.