नवी दिल्ली - समझोता बॉम्बस्फोट प्रकरणी स्वामी असीमानंद आणि इतर तीन आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले यावरुन भाजपाने आपले मौन सोडले आहे. काँग्रेसने जाणूनबुजून हिंदू दहशतवाद असा शब्द आणला आणि मतांसाठी हिंदू दहशतवादाची थिअरी मांडली गेली असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते अरुण जेटली यांनी काँग्रेसवर केला.
अरुण जेटली म्हणाले की, हिंदू दहशतवाद हे काँग्रेसने रचलेलं षडयंत्र आहे. हिंदू दहशतवाद शब्दाचा वापर करुन या समाजाची प्रतिमा खराब करण्याचे काम काँग्रेसने केले. कोणतेही ठोस पुरावे नसताना युपीए सरकारने या प्रकरणासाठी विलंब लावला गेला. जे खरे आरोपी होते त्यांना शिक्षा मिळाली नाही. सामान्य लोकांचे जीव गेले. याची जबाबदारी युपीएने आणि काँग्रेसने घ्यायला हवी असं अरुण जेटली यांनी सांगितले.
तसेच हिंदू दहशत ही थेअरी बनविण्यासाठी चुकीच्या माणसांना पकडण्यात आले. सुनावणीच्यावेळी विविध तर्क सुचवले गेले असा दावाही जेटली यांनी केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात चालणारी समझोता एक्सप्रेसमध्ये 18 फेब्रुवारी 2007 मध्ये हरयाणा येथे पानीपतजवळ स्फोट झाला. जेथे हा स्फोट झाला ते ठिकाण भारताच्या हद्दीतलं शेवटचं स्टेशन होतं. या स्फोटात 68 लोकांचा मृत्यू झाला.
हिंदूंना दहशतवादी मानणारे लोक आज हिंदू धर्माबद्दल श्रध्दा दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण समाजाला दहशतवादी बोलणाऱ्यांना या धर्मातील लोक सहन करणार नाहीत अशी टीका अरुण जेटली यांनी प्रियंका गांधी यांच्यावर केली.