सोनभद्र : उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील उंभा या गावी जमिनीच्या वादातून उसळलेल्या हिंसाचारात १० जण ठार झाले होते. त्याप्रकरणी काँग्रेस नक्राश्रू ढाळत आहे, असा आरोप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. या हिंसाचारातील पीडितांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी सोनभद्र येथे भेटायला चाललेल्या असताना पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवून ताब्यात घेतले. त्यामुळे प्रियांका गांधी यांनी या पीडितांची चुनार किल्ला गेस्ट हाऊसमध्येच भेट घेतली. त्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी उंभा गावाचा दौरा केला.
ते म्हणाले की, उंभामध्ये झालेल्या हिंसाचारात जे जखमी झाले त्यांच्यावरील उपचारांचा सर्व खर्च राज्य सरकारकडून केला जाईल. या दौºयात योगी आदित्यनाथ यांच्या समवेत उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह, पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह, मुख्य सचिव अनुपचंद्र पांडे होते. जमिनीचा ताबा घेण्याच्या वादातून उंभा गावचा सरपंच यज्ञदत्त व त्याच्या समर्थकांनी केलेल्या गोळीबारात गोंड आदिवासी जमातीचे दहा जण ठार झाले होते.
बळी गेलेल्या कुटुंबियांना आवाज दडपण्याचे प्रयत्न उत्तर प्रदेश आदित्यनाथ सरकारकडून सुरू असून, त्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही अशी टीका प्रियांका गांधी यांनी शनिवारी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, उंभा येथे झालेला हिंसाचार हे काँग्रेसचेच पाप असून त्यापासून हा पक्ष हात झटकण्याचा प्रयत्न करीत आहे.
बळींच्या वारसदारांना दहा लाखांची भरपाई द्याउंभा येथील हिंसाचारात बळी पडलेल्यांच्या वारसदारांना प्रत्येकी दहा लाख रुपये व जमीन देण्यात यावी, अशी मागणी या लोकांनी योगी आदित्यनाथ यांच्या दौºयाआधी केली. जे जखमी झाले त्यांना प्रत्येकी ७ लाख रुपयांची भरपाई व सहा बिघे जमीन द्यावी, अशीही मागणी झाली आहे.
या घटनेतील एक जखमी छोटेलाल याने सांगितले की, जनतेची सेवा करण्यासाठी सरपंचाला निवडून दिले जाते. मात्र, त्याने जनसेवा करण्याऐवजी आमच्यावरच गोळीबार केला. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी फासावर लटकवावे.