शीलेश शर्मा / नवी दिल्लीविधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा दर्जा अत्यंत खालावत गेला असून आता तो निवडणूक आयोगाच्या दारावर धडकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभांमध्ये जी भाषा वापरतात ती सरळसरळ आचारसंहितेचे उल्लंघन आहे, अशी तक्रार काँग्रेसने आयोगाकडे केली आहे. काँग्रेससह इतरही राजकीय पक्षांनी मोदी भाषणांत वापरत असलेल्या भाषेला आक्षेप घेतला आहे. मोदी एका प्रचारसभेत म्हणाले होते की, रमजानमध्ये वीज येते तर ती दिवाळीतही आली पाहिजे, भेदभाव व्हायला नको. आणखी एका प्रचारसभेत ‘गावात कब्रस्तान बनवले जाते तर स्मशानही व्हायला पाहिजे, असे म्हणाले. काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्षासह इतर राजकीय पक्षांनी मोदी मतदारांची धार्मिक आधारावर विभागणी व्हावी यासाठी मुद्दाम अशी भाषणे करतात, असा आरोप केला आहे. काँग्रेसची कायदे शाखा निवडणूक आयोगाकडे याबद्दल दाद मागत आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा म्हणाले की, मोदी भाषणात जी भाषा वापरतात त्यामुळे पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. ते राजकीय स्वार्थासाठी समाजाला जात, धर्म आणि भाषा या आधारावर विभागू इच्छितात. देशाच्या इतिहासात कोणत्याही पंतप्रधानाने या थराला जाऊन भाषण केलेले नाही.मोदी यांनी अखिलेश, राहुल, मायावती आणि समाजवादी पक्षाचा उल्लेख ‘स्कॅम’ असा केला. त्यांनी त्याची फोड अशी केली. एस म्हणजे समाजवादी पक्ष, सी म्हणजे काँग्रेस, ए म्हणजे अखिलेश आणि एम म्हणजे मायावती. आता हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे आहे. के. सी. मित्तल यांनी या वक्तव्यांची दखल घेत कारवाईची मागणी केली आहे.
निवडणूक आयोगाकडे काँग्रेसची तक्रार
By admin | Published: February 21, 2017 1:31 AM