आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क
उदयपूर : जनतेशी तुटलेला संपर्क वाढवण्यासाठी काँग्रेसने येत्या २ ऑक्टोबरपासून काश्मीर ते कन्याकुमारी अशी यात्रा काढण्याचा व जनसंपर्क वाढविण्याचा निर्धार काँग्रेसने उदयपुरातील नवसंकल्प शिबिरात केला. ‘एक व्यक्ती, एक पद’, ‘एक कुटुंब, एक तिकीट’ हे धोरण अमलात येईल, असे ठरवण्यात आले. रविवारी या शिबिराची सांगता झाली.
काँग्रेस कार्यकारिणी, राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश, जिल्हा, ब्लॉक आदी स्तरांवरील पदाधिकाऱ्यांपैकी निम्मे पदाधिकारी हे ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे असतील, असे ठरविण्यात आले. प्रत्येक प्रांतातील विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यास राजकीय घडामोडींविषयक समिती स्थापन करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला.
- काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत यात्रा काढणार
- ‘एक व्यक्ती, एक पद’, ‘एक कुटुंब, एक तिकीट’
- निम्मे पदाधिकारी हे ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे
- राजकीय घडामोडींविषयक निर्णयासाठी समिती
आयटी सेल अधिक मजबूत करणार कार्यकर्त्यांसाठी ट्रेनिंग
काँग्रेस नॅशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन करून नेते, कार्यकर्त्यांचे पक्षाची धोरणे, केंद्राची धोरणे, विद्यमान प्रश्न आदींबाबत प्रबोधन केले जाईल. प्रशिक्षण देण्यात येईल. निवडणूक व्यवस्थापन विभाग सुरू होणार आहे. जनतेचे मत घेण्यास पब्लिक इनसाइट विभाग स्थापणार.
भारत जोडो असा नारा देत काँग्रेस २ ऑक्टोबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर अशी एक भव्य यात्रा काढणार आहे. लोकांशी संपर्क साधणार आहे. - राहुल गांधी, काँग्रेस नेते