नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांत तीन अंकी जागा जिंकण्याचा आत्मविश्वास काँग्रेसला वाटत आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब या राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली राहील, असे या पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे.काँग्रेसने १९९९च्या लोकसभा निवडणुकांत केवळ ११९ जागा जिंकल्या होत्या. मात्र २०१४च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला फक्त ४४ जागांवर विजय मिळाला. त्या वेळी गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, दिल्ली, ओडिशा या राज्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. एवढेच नव्हेतर, कोणत्याही राज्यात काँग्रेसला दोन अंकी जागा मिळाल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला यंदा आपल्या जागा तीन अंकात म्हणजे १00 वा त्याहून अधिक असतील, अशी खात्री वाटत आहे.
राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची अवस्था फारच केविलवाणी झाली होती. लोकसभेतील एकूण जागांच्या दहा टक्केही जागा जिंकता न आल्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळाले नव्हते. यंदाच्या लोकसभा निवडणुकांत आंध्र प्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, दिल्ली, ईशान्य भारतातील राज्ये येथे मोठे यश मिळणार नाही याची खूणगाठ काँग्रेसने मनाशी बांधली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह वरील सात राज्यांवर काँग्रेसची भिस्त दिसत आहे.
लोकसभा निवडणुकांचा अंतिम म्हणजे सातवा टप्पा १९ मे रोजी पार पडल्यानंतर मतदारसंघनिहाय आढावा घेऊन आपल्याला किती जागा मिळू शकतील, याचा काँग्रेस पुन्हा अंदाज घेणार आहे. मोदी सरकार जनतेला नकोसे झाले असून ते बदलण्यासाठी लोकसभा निवडणुकांत जनतेने मतदान केल्याचा काँग्रेसचा दावा आहे. काँग्रेसने पक्षातर्फे देशभर जे सर्वेक्षण केले आहे, त्यातून हा निष्कर्ष निघाला असल्याचे समजते. अलीकडेच ज्या राज्यांत विधानसभा निवडणुकांत झाल्या, तेथील जागांमध्ये २0१४ च्या तुलनेत मोठी वाढ होईल, असे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिंघवी म्हणतात, सर्वाधिक जागा जिंकूलोकसभा निवडणुकांनंतर सर्वांत जास्त जागा जिंकणारा पक्ष म्हणून काँग्रेस पुढे येईल, असा दावा त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे. पुरेशा बहुमताच्या बळावर बिगरभाजप सरकार केंद्रात स्थापन करणे शक्य होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.