तिरुअनंतपुरम/थ्रिसूर :काँग्रेसच्या कर्नाटकमधील विजयाच्या पार्श्वभूमीवर २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील या सर्वांत जुन्या पक्षाने कोणती भूमिका घ्यावी याबाबत केरळमधील सत्ताधारी माकपात मतभेद असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस देशाच्या अनेक भागांत कमकुवत असून ती भाजपविरुद्ध स्वबळावर लढा देऊ शकत नाही, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन व माकपाचे राज्य सचिव एम. व्ही. गोविंदन यांचे मत आहे, तर राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री साजी चेरियान यांना काँग्रेसने देश पातळीवर विरोधी आघाडीचे नेतृत्व करावे, असे वाटते. अनेक वर्षे देशावर सत्ता गाजवणारी काँग्रेस आज पूर्वीसारखी नाही. काँग्रेसने हे लक्षात घेतले पाहिजे. देशाच्या अनेक भागांत ती आज कमकुवत आहे. त्यामुळे भाजपला धूळ चारण्यासाठी राज्यांतील भाजपविरोधी सर्व गटांना एकत्र आणणे आणि भाजपचा राज्यनिहाय मुकाबला करणे हीच व्यावहारिक रणनीती आहे,” असे विजयन म्हणाले. ते त्रिशूर जिल्ह्यातील गुरुवायूर येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते. एक दिवसापूर्वी गोविंदन यांनीदेखील असेच मत व्यक्त केले होते. कर्नाटक निवडणुकीचे निकाल काँग्रेसचे पुनरागमन दर्शवत नाहीत आणि हा सर्वांत जुना पक्ष स्वबळावर भारताला भाजपमुक्त करू शकत नाही. ते (काँग्रेस) देखील तसा दावा करत नाहीत,” असे गोविंदन म्हणाले होते.रविवारी चेरियान म्हणाले की, काँग्रेस भारतातील सर्वात मजबूत पक्षांपैकी एक आहे व त्यांना भाजपविरोधातील लढाईत पुढे येण्यास सांगणे यात काहीही गैर नाही. त्यांना आघाडीचे नेतृत्व करू द्या,” असेही ते म्हणाले. त्याच वेळी केरळमधील विविध मुद्द्यांवर काँग्रेसच्या भूमिकेशी आपण सहमत नाही, असेही ते म्हणाले.
कर्नाटकात ४० टक्के, केरळमध्ये तब्बल ८० टक्के कमिशन -त्रिशूर (केरळ) : कर्नाटकातील मावळते भाजप सरकार “४० टक्के कमिशनचे सरकार” असल्याचा आरोप करत तेथील निवडणूक जिंकलेल्या काँग्रेसने सोमवारी केरळमधील सत्ताधारी एलडीएफ सरकारवर हल्लाबोल करताना ते “८० टक्के कमिशन”चे सरकार असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्यांदा सत्ता मिळाल्याने सत्ताधारी डावे पक्ष व मुख्यमंत्र्यांना गर्व झाला आहे, असे काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.