Parliament Monsoon Session 2023: विरोधकांकडून सत्ताधारी केंद्र सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास ठराव आणण्यात आला होता. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात उत्तर दिले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर सडकून टीका केली. तसेच मणिपूरवर भाष्य करत संपूर्ण देश मणिपूरवासीयांसोबत असल्याची ग्वाही दिली. यानंतर आता विरोधकांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणावर टीका केली असून, लोकसभा सभागृहाचा वापर निवडणुकीच्या आखाड्याप्रमाणे केला, असा आरोप करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेले भाषण एका निवडणूक प्रचाराच्या रॅलीसारखे होते. पंतप्रधान मोदी यांना काँग्रेस-फोबिया झाला आहे. पंतप्रधानांनी हट्टीपणा आणि अहंकार सोडला असता आणि मणिपूरवरील चर्चेला तयारी दाखवली असती, तर संसदेचा बहुमूल्य वेळ फुकट गेला नसता. अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चांगली चर्चा झाली असती, या शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हल्लाबोल केला आहे.
सुरुवातीची ९० मिनिटे मणिपूरवर चकार शब्द काढला नाही
मणिपूर हिंसाचाराच्या संवेदनशील मुद्द्यावर विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणावा लागला. मात्र, पंतप्रधानांनी सभागृहाचा वापर निवडणुकीच्या आखाड्याप्रमाणे केला. अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी केवळ काँग्रेसवर टीका करण्याचे काम केले. मणिपूरबाबत अगदी अल्पकाळ संवाद साधला. सुरुवातीची ९० मिनिटे मणिपूरवर चकार शब्दही काढण्यात आला नव्हता. म्हणूनच विरोधकांनी सभात्याग केला, अशी टीका काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी केली.
दरम्यान, नजीकच्या भविष्यात शांततेचा सूर्य मणिपूरमध्ये निश्चितपणे उगवेल. हा देश, हे सभागृह मणिपूरच्या माताभगिनींच्या सोबत आहे. ईशान्य भारत आमच्या हृदयाचा तुकडा आहे. आम्ही सारे मिळून मणिपूरच्या आव्हानांवर तोडगा काढून तिथे पुन्हा शांतता प्रस्थापित होईल, ते राज्य पुन्हा विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करेल. त्यात कुठलीही कसर राहणार नाही, असे सांगत विरोधकांवर पंतप्रधान मोदींनी घणाघाती टीका केली. विरोधकांची इंडिया आघाडी नाही, तर घमंडिया आघाडी आहे. आघाडीच्या वरातीतील प्रत्येकाला नवरदेव व्हावेसे वाटते आहे. प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचे आहे, असे म्हणत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.