"मिस्टर ५६ इंच 'चीन' शब्दाचा वापरही करत नाहीत"; राहुल गांधींचे टीकास्त्र
By देवेश फडके | Published: January 25, 2021 01:59 PM2021-01-25T13:59:02+5:302021-01-25T14:01:12+5:30
भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये झटापट झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये झटापट झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेकेंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भारत-चीन सीमेवरील स्थिती देशासमोर स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.
मिस्टर ५६ यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून चीन हा शब्दही वापरला नाही. कदाचित चीन शब्दाचा वापर करून सुरुवात केली जाईल, असा चिमटा राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून काढला आहे. भारत-चीन सीमावादावरून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.
China is expanding its occupation into Indian territory.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 25, 2021
Mr 56” hasn’t said the word ‘China’ for months. Maybe he can start by saying the word ‘China’.
मोदीजी, देशातील सीमेवर चीनचे अतिक्रमण आणि घुसखोरी यासंदर्भातील आपले मौन शत्रूचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. चीनला घाबरण्याचे काहीच कारण नाही. संपूर्ण देश मजबुतीने लढा देईल. खरी परिस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणे चुकीचे आहे. हा लपंडावाचा खेळ नाही. भारत-चीन सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे. देशाला विश्वासात घ्यावे, असेही सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, भारत-चीन सीमेवर तणाव असताना पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही देशांदरम्यान पुन्हा तणाव वाढला आहे. या झटापटीत भारताचे ४ जवान आणि चीनचे २० सैनिक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. तीन दिवसांपूर्वी सिक्किमच्या के ना कुला पासवर ही झटापट झाल्याचे सांगितले जात आहे. सीमेवरील हा तणाव कमी करण्यासाठी रविवारी भारत-चीन दरम्यान सुमारे १५ तास बैठक सुरू होती.