देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. पण, त्याअगोदरच निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता. मात्र त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि अरूण गोयल यांनी दिलेला हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. यावर आता काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. या राजीनाम्यावर काँग्रेसने चिंता व्यक्त केली आहे.
निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसने चिंता व्यक्त केली आहे. स्वतंत्र संस्थांचा पद्धतशीर ऱ्हास थांबवला नाही, तर लोकशाही हुकूमशाहीने काबीज केली जाईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे.
पंतप्रधान १३ मार्चला उरकणार राज्यांचा दौरा; पुढील आठवड्यात फुंकणार लोकसभेचा बिगुल
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करत चिंता व्यक्त केली.ट्विटमध्ये म्हटले की, भारतात आता फक्त एकच निवडणूक आयुक्त आहेत. तेही काही दिवसांत लोकसभा निवडणुका जाहीर होणार असताना. जर आपण स्वतंत्र संस्थांचा पद्धतशीरपणे नाश थांबवला नाही तर आपली लोकशाही हुकूमशाहीने उधळली जाईल. ECI आता पडणाऱ्या शेवटच्या घटनात्मक संस्थांपैकी एक असेल. निवडणूक आयुक्त निवडण्याची नवी प्रक्रिया आता सत्ताधारी पक्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडे प्रभावीपणे गेली आहे. कार्यकाळ पूर्ण होऊन २३ दिवस उलटूनही नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती का झाली नाही? मोदी सरकारने या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असंही खरगे यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनीही ट्विटरवरुन टीका केली, "जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी हे अत्यंत चिंताजनक आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. ECI कसे काम करते? घटनात्मक संस्था कशी कार्यरत आहे? त्यावर सरकार कसा दबाव आणते, याबाबत पारदर्शकता नाही. ही वृत्ती लोकशाही परंपरा नष्ट करण्यावरच राजवटीची झुकलेली असल्याचे दिसून येते. निवडणूक आयोग नेहमी पूर्णपणे निःपक्षपाती असणे आवश्यक आहे, अशी टीका केसी वेणुगोपाल यांनी केली.
कायदा मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, गोयल यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारपासून स्वीकारला आहे. त्यांनी पद का सोडले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गोयल हे १९८५ च्या बॅचचे पंजाब केडरचे आयएएस अधिकारी होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये ते निवडणूक आयोगात रुजू झाले. अनुप चंद्र पांडे यांच्या निवृत्तीनंतर आणि गोयल यांच्या राजीनाम्यानंतर तीन सदस्यीय निवडणूक आयोगात आता एकच सदस्य उरले आहेत.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले म्हणाले की, ही बाब चिंताजनक आहे. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पॅनेलवर दोन नियुक्त्या कराव्यात. आपल्या ट्विटमध्ये गोखले म्हणाले की, निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिला आहे. निवडणूक आयोगाचे पद रिक्त आहे. निवडणूक आयोगाकडे फक्त एकच मुख्य निवडणूक आयुक्त उरले आहेत'.