नवी दिल्ली : दिल्लीच्या ईशान्य भागात गेल्या रविवारपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर नियंत्रण आणण्यात बुधवारी पोलीस व निमलष्करी दलाला काहीसे यश आले आहे. तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिल्लीतील दंगलग्रस्त भागाचा दौरा केला आहे. यावरूनच काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.
मंगळवारी रात्री उशिरा डोवाल यांनी ईशान्य दिल्लीतील दंगलग्रस्त भागाचा दौरा केला. यात त्यांनी जाफराबाद, मौजपुरी, गोकुलपुरी, सिलमपूर भागाचा पाहणी केली. डोवाल यांच्या दौऱ्यावरून आता विरोधकांनी प्रश्न उपस्थित करत केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे.
रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, दिल्लीतील दंगलग्रस्त भागाचा अजित डोवाल यांनी दौरा केला असून, यातून मोदींनी स्पष्ट केलं आहे की, गृहमंत्री म्हणून अमित शहा हे अपयशी ठरले आहे. तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुद्धा हेच म्हटलं आहे. तसेच मोदींना अयशस्वी ठरलेल्या गृहमंत्रीवर जर विश्वास नसेल तर त्यांनी त्यांचे पद काढून घ्यावा, असा खोचक टोला सुरजेवाला यांनी लगावला.