नवी दिल्ली, दि. 26- देशाचे 14 वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. त्यावेळी रामनाथ कोविंद यांनी केलेल्या भाषणावर काँग्रेसने आता टीका केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या पहिल्याच भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आवडतील असे, विचार मांडल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या भाषणात महात्मा गांधी तसंच दिनदयाळ उपाध्याय यांचा उल्लेख केला पण कोविंद यांनी आपल्या भाषणात पंडित नेहरूंचा उल्लेख केला नाही. ही गोष्ट दुर्देवी असल्याचं काँग्रेसने म्हंटलं आहे. बुधवारी राज्यसभेत हा मुद्दा काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पहिल्याच भाषणाचे पडसाद बुधवारी सकाळी राज्यसभेत उमटले. काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर अर्थमंत्री अरुण जेटली आणि शर्मा यांच्यात शाब्दिक चकमत उडाली. सरकार नियोजीत पद्धतीने काँग्रेसच्या बड्या नेत्यांची नावं कमी करण्याचा प्रयत्न करते आहे. आनंद शर्मा राष्ट्रपतींच्या भाषणाचा उल्लेख करत म्हणाले,'स्वातंत्र्याच्या काळात नेहरू महान नेते होते. भारताचं पहिलं पंतप्रधान पद त्यांनी भुषविलं आहे. त्यांनी 14 वर्ष इंग्रजांचा तुरूंगवास भोगला आहे. पण आज सरकारकडून नियोजीत पद्धतीने या नेत्यांची नावं न घेण्याचा प्रयत्न होतो आहे, असं खासदार आनंद शर्मा म्हणाले आहेत. तर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनीही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणावर टीका केली आहे. 'राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सरदार पटेल आणि आंबेडकर या जवाहरलाल नेहरूंच्या कॅबिनेट मंत्र्यांचा उल्लेख करावा पण देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचं नाव घेऊ नये हे खूप दुर्दैवी आहे. नेहरू फक्त भारताचे पंतप्रधान नव्हते, तर ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. आणखी एक दुर्दैवी बाब म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची त्यांनी तुलना केली. राष्ट्रपती कोविंद यांनी आता हे ध्यानात घ्यायला हवं की ते आता देशाचे राष्ट्रपती आहेत, भाजपचे सदस्य नाही. त्यांना आता भारताच्या संविधानाचं रक्षण करायचं आहे. त्यांनी पक्षीय राजकारणापलिकडे विचार करायला हवा, असं काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले.
भाषणात काय म्हणाले होते कोविंद ?राष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यानंतर, आपल्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी प्रयत्न केले होते. सरदार पटेल यांनी संपूर्ण देश एक केला. आपल्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना प्रजासत्ताकाचं महत्त्व पटवून दिलं. वेगाने विकसित होणारी आपली अर्थव्यवस्था आहे. या वेळी सर्वांना संधी देणाऱ्या समाजाची निर्मिती करणं आवश्यक आहे. महात्मा गांधी आणि दीनदयाळ उपाध्याय यांनी ज्यापद्धतीने समाजाची कल्पना केली होती. त्यापद्धतीने समाज व्हावा. असा भारत सर्वांना समान संधी देईल, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या भाषणात म्हणाले होते. तसंच सुरूवातील कोविंद यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद, राधाकृष्णन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी यांच्या नावाचा उल्लेख केला होता.