Congress CWC Meeting : महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसने दिल्लीत पक्ष कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. या बैठकीत पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा मुद्दा उपस्थित केला. भारताने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) ऐवजी पारंपरिक बॅलेट पेपरकडे परतावे. या गोष्टीत इतर कुठलाही मध्यम मार्ग असू शकत नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी पक्षाचे नेते राहुल गांधी म्हणाले की, आता निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करावे लागतील. कारण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहिली नाही. जात जनगणना आणि आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांवरून वाढवण्याबाबत काँग्रेसने जशी स्पष्ट भूमिका घेतली आहे, तशीच संभल प्रकरणासारख्या अन्य मुद्दय़ांवरही ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.
बैठकीनंतर केसी वेणुगोपाल काय म्हणाले?बैठकीबाबत केसी वेणुगोपाल म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा झाली. CWC ने पक्षाची निवडणूक कामगिरी आणि संघटनात्मक मुद्द्यांबाबत अंतर्गत समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समित्या बुथ आणि जिल्हा स्तरावर पक्षाच्या स्थितीचे मूल्यांकन करतील. यासोबतच, आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती आणि संघटनात्मक तयारी मजबूत करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगावर दबाव आणणे आवश्यक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या धर्तीवर निवडणूक आयोगाची जबाबदारी सुनिश्चित करण्यावर भर दिला जाईल, असे काँग्रेसने ठरवले आहे. निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगावर दबाव आणणे आवश्यक असल्याचे पक्षाचे मत आहे. यासोबतच CWC ने 1991 च्या 'Places of Worship (Special Provisions) Act' अंतर्गत आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, ज्याचे भाजपकडून उघडपणे उल्लंघन केले जात आहे.