यदु जोशी, मुंबईप्रचंड काथ्याकूट करून देखील आपल्या वाट्याच्या १७४ जागांपैकी ६४ मतदारसंघात प्रत्येकी एक उमेदवार ठरविण्यात काँग्रेसच्या छाननी समितीला अपयश आले आहे. उर्वरित ११० ठिकाणचे उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांच्या अध्यक्षतेखालील छाननी समितीची शेवटची बैठक बुधवारी रात्री येथे आटोपली. समितीने गेले दहा-बारा दिवस तासन्तास खल केला. एकेका मतदारसंघात तीन-तीन नावे होती. ती कमीकमी करीत नेली. तरीही ६४ मतदारसंघांमध्ये एकापेक्षा जास्त इच्छुकांची नावे आहेत. बहुतेक ठिकाणी दोन-दोन नावे यादीमध्ये आहेत.प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, छाननी समितीच्या पातळीवर चर्चेतून १०० हून अधिक नावे ठरविता आली हे मोठे यश आहे. आधी प्रदेश निवड मंडळाला आणि नंतर छाननी समितीला विश्वासात घेऊन ही प्रक्रिया करण्यात आली.छाननी समितीने निश्चित केलेली नावे १४ सप्टेंबरला केंद्रीय निवड मंडळासमोर ठेवली जातील आणि त्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी निश्चित केली जाईल, अशी शक्यता आहे. ज्या मतदारसंघांमध्ये एकपेक्षा जास्त नावे आहेत त्या बाबतचा निर्णय केंद्रीय मंडळ करेल. छाननी समिती त्यासाठी सहकार्य करेल. सूत्रांनी सांगितले की, विद्यमान सर्व आमदारांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता नाही. फारतर चार-पाच आमदारांना वगळले जाईल, असे आधी म्हटले जात होते. तथापि, आता हा आकडा मोठाही असू शकेल. काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदारांना बदलून नवीन लोकांना संधी दिली आणि त्याचा फायदा झाल्याची गेल्या वर्षभरात काही राज्यांमधील उदाहरणे त्यांच्या समर्थनार्थ दिली जात आहेत, असे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले.काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाची पुढची चर्चा होण्याचा मुहूर्त अद्याप निघालेला दिसत नाही. आता सगळेकाही दिल्लीत ठरेल, असे ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादीला ११४ पेक्षा एकही जागा वाढवून देऊ नये, अशी प्रदेश काँग्रेसची भूमिका असल्याचे ते म्हणाले. सूत्रांनी सांगितले की, ज्या ६४ मतदारसंघांमधील उमेदवार अद्याप ठरविण्यात आलेले नाहीत त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सुटू शकतील असे काही मतदारसंघ आहेत. काँग्रेस गेल्या तीन निवडणुकात जिंकू शकलेली नाही आणि तिथे राष्ट्रवादीचा सक्षम उमेदवार असेल तर ती जागा सोडण्याची पक्षाची तयारी असेल. उमेदवार न ठरण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, काही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कोण असतील यावर काँग्रेसचे उमेदवार निश्चित केले जातील.
काँग्रेसच्या ६४ जागांचा निर्णय होणार दिल्लीत
By admin | Published: September 12, 2014 2:16 AM