नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काहीही झालं तरी राजीनामा परत घेणार नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर, काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार हंगामी अध्यक्षपदी काँग्रेसचे सर्वात जेष्ठ सरचिटणीस मोतीलाल व्होरा यांची निवड झाली आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या घटनेमध्ये नमूद केल्या प्रमाणे हंगामी अध्यक्ष हे केवळ काँग्रेस कार्यकारिणीच्या पुढील बैठकीपर्यंतच अध्यक्षपदावर राहणार आहेत. मोतीलाल व्होरा हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.
काँग्रेसचे नवनियुक्त हंगामी अध्यक्ष मोतीलाल व्होरा यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींची मनधरणी करणार असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस कार्यकारणीच्या पुढील बैठकीत याबाबत चर्चा होईल, त्यावेळी मी राहुल यांनीच अध्यक्षपदाचा पदभार स्विकारावा अशी आग्रही मागणी करणार आहे, असेही व्होरा यांनी म्हटलंय.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, अद्याप नव्या अध्यक्षांची निवड झाली नाही. त्यामुळे राहुल पुन्हा सक्रीय होतील, असा कयास लावला जात होता. तर दुसरीकडे ज्येष्ठ नेत्यांमध्येही अध्यक्षपदावरुन काही नावांची कुजबुज सुरू होती. या चर्चेला सध्यातरी पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस नेतृत्वावरून सुरू असलेल्या पक्षातील चर्चेत राहुल यांनी निर्णयावर कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. मी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाही, मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नव्या अध्यक्षाची निवड काँग्रेसची कार्यकारी समिती करेल, असेही त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, राहुल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुनही आपले पद हटविले आहे. ट्विटर अकाऊंटवरील बायोटेडातून राहुल यांनी काँग्रेस प्रेसिडेंट हे पद असलेला शब्द काढून टाकला आहे. त्यामुळे ट्विटरवरही केवळ काँग्रेस पक्षाचा सदस्य आणि लोकसभा सदस्य असेच पद लिहिले आहे. त्यानंतर, आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांना हंगामी अध्यक्ष बनविण्यात आले आहे.