Who is Surender Panwar : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. कुस्तीपटू विनेश फोगाटचा या यादीत समावेश असून, काँग्रेसने अशा एका नेत्यालाही निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे, जो सध्या तुरुंगात आहे. सुरेंद्र पंवार असे त्यांचे नाव असून, ईडीने त्यांना जुलै महिन्यात अटक केली होती.
काँग्रेसने सोनीपत विधानसभा मतदारसंघाचे विद्ममान आमदार सुरेंद्र पंवार यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. सुरेंद्र पंवार सध्या तुरुंगात आहेत. जुलै महिन्यामध्ये ईडीने त्यांना अटक केली होती. अवैध उत्खनन प्रकरणात ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर सुरेंद्र पंवार यांना अटक करण्यात आली होती.
भाजपच्या आमदाराचा केला होता पराभव
सुरेंद्र पंवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सोनीपतमधून विजय मिळवला. या मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेल्या कविता जैन यांचा त्यांनी पराभव केला होता. यमुनानगर परिसरात सुरेंद्र पंवार यांनी मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन केल्याचा आरोप आहे. ईडीच्या आरोपानुसार सुरेंद्र पंवार यांनी या अवैध उत्खननातून ४००-५०० कोटी रुपये कमावले आहेत.
काँग्रेसची भाजपच्या उलट रणनीती?
भाजपने हरियाणामध्ये अनेक विद्यमान आमदार आणि मंत्र्यांची तिकिटे कापली. बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली आहे. दुसरीकडे काँग्रेसने विद्यमान आमदारांना पुन्हा तिकिटे दिली आहेत.
मुख्यमंत्री सैनींविरोधात मेवा सिंह यांना उमेदवारी
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांच्याविरोधात काँग्रेसने मेवा सिंह लाडवा यांना उमेदवारी दिली आहे. तर हरियाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदय भान हे होडल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.