आसाम, केरळमध्ये काँग्रेसचा पराभव अंतर्गत गटबाजीमुळे, सत्यशोधन समितीच्या अहवालाचा निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 06:13 AM2021-06-11T06:13:59+5:302021-06-11T06:14:45+5:30
Congress : समितीच्या एका सदस्याने ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, ‘वृत्तपत्रांत आलेल्या बातम्या निराधार आहेत. या बातम्यांत आसाममध्ये झालेल्या पराभवाला बदरुद्दीन अजमल यांचा पक्ष एआययूडीएफशी काँग्रेसने केलेली युती जबाबदार असल्याचे म्हटले.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : आसाम आणि केरळसारख्या राज्यांत काँग्रेसचा अंतर्गत कलह आणि गटबाजीमुळे पराभव झाला, असा खुलासा समितीच्या अहवालात करण्यात आला आहे. ही समिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यासाठी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्थापन केली होती.
समितीच्या एका सदस्याने ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, ‘वृत्तपत्रांत आलेल्या बातम्या निराधार आहेत. या बातम्यांत आसाममध्ये झालेल्या पराभवाला बदरुद्दीन अजमल यांचा पक्ष एआययूडीएफशी काँग्रेसने केलेली युती जबाबदार असल्याचे म्हटले. वस्तुस्थिती ही आहे की, राज्यस्तरावर नेत्यांमध्ये असलेल्या गटबाजीने कार्यकर्त्यांची गटागटांत विभागणी झाली. त्यांच्यात कोणताही समन्वय नव्हता. एआययूडीएफशी काँग्रेसने जर युती केली नसती तर पक्षाची कामगिरी आणखी वाईट झाली असती.’ केरळी चर्चा करताना हा सदस्य म्हणाला की, राहुल गांधी यांची उपस्थिती असतानाही ओमान चंडी तथा रमेश चेन्नीथला यांच्यात गटबाजी झाली. ते एक दुसऱ्याचे नुकसान करू लागले.
नेते काय म्हणतात?
पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणतात की, ‘अंतर्गत गटबाजी काही नवी नाही; परंतु सत्तेतून दूर झाल्यामुळे प्रत्येक राज्यात गटबाजीने वेग घेतला आहे. हार्दिक पटेल यांनी याच गटबाजीमुळे काँग्रेसमधून बाहेर पडण्याची धमकी पक्षश्रेष्ठींना दिली आहे. पंजाब, राजस्थान, छत्तीसगडसह सर्व राज्यांत काँग्रेसमध्ये गट-तट आहेत. परंतु, नेतृत्व त्यावर उपाय शोधू शकले नाही. त्यामुळे गटबाजी वाढत आहे.’