काँग्रेसच्या तीन राज्यांतील पराभवाने समीकरण बिघडले, आता JDUने INDIA आघाडीबाबत केली अशी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 15:20 IST2023-12-03T15:19:29+5:302023-12-03T15:20:19+5:30
Assembly Election Result 2023: राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्याबरोबरच या पराभवामुळे काँग्रेसचे विरोधी पक्षांच्या आघाडीतील समिकरण बिघडले आहे.

काँग्रेसच्या तीन राज्यांतील पराभवाने समीकरण बिघडले, आता JDUने INDIA आघाडीबाबत केली अशी मागणी
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्याबरोबरच या पराभवामुळे काँग्रेसचे विरोधी पक्षांच्या आघाडीतील समिकरण बिघडले आहे. तसेच आता या आघाडीतील मित्रपक्षांनी काँग्रेसवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. जेडीयूचे राज्य सरचिटणीस निखिल मंडल यांनी एक्सवर पोस्ट करत काँग्रेसला टोला लगावताना लिहिले की, आता इंडिया आघाडीनेनितीश कुमार यांच्या मतानुसार वाटचाल केली पाहिजे.
काँग्रेसला टोला लगावताना निखिल मंडल म्हणाले की, मागच्या काही काळात काँग्रेस पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत गुंतलेली होती. त्यामुळे त्यांना इंडिया आघाडीवर लक्ष देता येत नव्हते. आता काँग्रेसने निवडणूक लढवली आहे. तसेच निकालही समोर आहेत. नितीश कुमार हेच इंडिया आघाडीचे सूत्रधार आहेत आणि तेच या आघाडीची नौका पार करू शकतात.
दरम्यान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील मतमोजणीमध्ये भाजपाने आघाडी घेताना स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. त्यामुळे भाजपामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निकाल जाहीर होत असतानाच ६ डिसेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे.