Ghulam Nabi Azad : काँग्रेसमुळेच इतरांचा पराभव, स्थानिक पक्ष का आघाडी करतील? गुलाम नबी आझादांचं मर्मावर बोट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 09:01 AM2023-04-05T09:01:37+5:302023-04-05T09:04:10+5:30
काँग्रेसचे माजी दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी अनेक विषयांवर भाष्य करत काँग्रेसचा खरपूस समाचार घेतलाय.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाला सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येतील अशीही चर्चा आहे. या सगळ्यात काँग्रेसचे माजी दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी अशा कोणत्याही शक्यता नाकारल्या आहेत. याऊलट त्यांनी काँग्रेसवरच टीकास्त्र सोडलं. याशिवाय राहुल गांधींच्या कोर्टात हजेरी लावण्यासाठी सूरतला जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवरही जोरदार टीका केली.
'आझाद' या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या आधी 'द इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राशी आझाद यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक बाबींवर भाष्य केलं. “काँग्रेस पक्षात काहीही बदललं नाही. ज्या ठिकाणी मजबूत स्थानिक नेते आहेत, त्याच राज्यांमध्ये त्यांना विजयाची अपेक्षा आहे. त्यांच्यामुळे पक्षाचा कोणत्या राज्यात विजय होतोय किंवा पराभव होतोय याचा दावा ते करू शकत नाहीत,” असंही ते म्हणाले. त्यांनी अप्रत्यक्षपणे गांधी कुटुंबावरही निशाणा साधला.
"काँग्रेसवर संताप"
“केंद्रीय नेतृत्वाचा कोणत्याही जागेवर कोणताही प्रभाव नाही. ते ना कोणाला जिंकवू शकत ना कोणाचा पराभव करू शकत. काँग्रेस नेत्यांचा जय-पराजय त्या ठिकाणच्या विद्यमान नेतृत्वावर अवलंबून आहे,” असं म्हणत आझाद यांनी संताप व्यक्त केला.
यावेळी त्यांना विरोधकांच्या एकतेवर प्रश्न विचारण्यात आला. “मला वाटत नाही कोणालाही राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाकांक्षा आहे. कोणाला तशी असेलही. परंतु आता प्रत्येक जण तितकंच खा जितकं पचू शकेल असा विचार करतो. भारतासारख्या मोठ्या देशात एक राष्ट्रीय पक्ष बनवणं आणि सोबत येऊन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं अतिशय कठीण आहे. विरोधक एकत्र येणार नाहीत. एक राजकीय कार्यकर्ता म्हणून माझं हेच म्हणणं आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
"छोटे पक्ष राज्यातच आनंदी"
विरोधकांची एकजूट व्हावी अशी माझी इच्छा आहे, पण गेल्या ४०-५० वर्षांत मी जवळपास प्रत्येक राजकीय पक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांना ओळखतो. मी बहुतेक वेळा त्यांच्याशी आघाडीवर चर्चा केली आहे. मी म्हणू शकतो की प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या राज्यात आनंदी आहे. प्रत्येक प्रादेशिक पक्षाला आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर गेल्यास आपला पराभव होईल. राज्यात त्यांचं लक्ष कमी झाल्यास दुसरा कब्जा करेल, असं त्यांना वाटत असल्याचं आझाद म्हणाले.
“काँग्रेसमुळेच पराभव”
“पश्चिम बंगालमध्ये जर आघाडी झाली तर त्या ठिकाणी काँग्रेसकडे काय आहे? एकही जागा नाही. काँग्रेस टीएमसीला कसा फायदा करून देईल? ममता बॅनर्जी ४२ पैकी ५-१० जागा काँग्रेसला का देईल. आघाडी त्याच ठिकाणी होते जिकडे मत घेण्याची क्षमता असते. हे सध्या अशक्य आहे. काही ठिकाणी तर काँग्रेसमुळे त्या ठिकाणच्या स्थानिक पक्षांचा पराभव झालाय अशी परिस्थिती आहे,” असं त्यांनी नमूद केलं.