नवी दिल्ली: फेसबुकवरील माहितीचा गैरवापर होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर भाजपा आणि काँग्रेसमधील 'डाटा'युद्ध आणखी तीव्र झाले आहे. कालच दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या अॅपच्या माध्यमातून डेटा चोरी होत असल्याचे आरोप केले होते. यानंतर सोमवारी सकाळी काँग्रेस पक्षाकडून प्ले स्टोअरमधून त्यांच्या पक्षाचे INC India हे अधिकृत अॅप्लिकेशन हटवण्यात आले. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरी होत असल्याचे भाजपाने म्हटले होते. या अॅपच्या सिंगापूर येथील सर्व्हरमधून ही माहिती चोरी होत असल्याचे भाजपाचे म्हणणे होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक पाऊल मागे घेत प्ले-स्टोअरवरून पक्षाचे अॅप्लिकेशन काढून टाकण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपवरील डेटाचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला होता. या अॅपवरील डेटा अमेरिकेत विकली जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्यानंतर भाजपाने लगेच पलटवार केला व गांधी व काँग्रेसला तंत्रज्ञानाविषयी काहीही कळत नसल्याचेच यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचा टोमणा मारला होता. नमो अॅप वापरणाऱ्या असंख्य भारतीयांच्या डेटाचा गैरवापर केला जात असल्याचा दावा इलियट एल्डरसन या फ्रेंच हॅकरने केल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करुन पंतप्रधान मोदी ही माहिती अमेरिकन कंपन्यांना देत असल्याचा आरोप केला. जेव्हा राहुल गांधी यांच्या अनुयायांनी ट्विटरवर ‘डिलिटनमोअॅप' हा ट्रेंड शनिवारी सुरु केला त्याचा परिणाम उलटाच झाला. नमो अॅप डाऊनलोड करुन घेण्याचे प्रमाण व लोकप्रियता दोन्ही वाढले, असा दावाही भाजपाने केला.
काँग्रेसनं हटवलं पक्षाचं अॅप; डेटा चोरीच्या भाजपाच्या पलटवारानंतर एक पाऊल मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 1:05 PM