ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ८ - पनामाच्या मोसेक फोन्सेका कंपनीची महत्वपूर्ण व गोपनीय कागदपत्रे लीक झाल्याने 500 भारतीयांची नावे समोर आली असून याप्रकरणी प्रामाणिकपणे तपास व्हावा याकरिता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना बाहेर ठेवावं अशी मागणी काँग्रेसने केली आहे. पमानाच्या यादीत जगभरातील अनेक महत्वपूर्ण , धनाढ्य व्यक्ती,उद्योगपती, सेलिब्रिटी, राजकारण्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत ५०० भारतीयांचीही नावे असून त्यामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, सून ऐश्वर्या राय-बच्चन, उद्योजक गौतम अदानी, के.पी.सिंग यांच्यासह काही राजकारणीही आहेत.
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असणा-या अरुण जेटली यांनी लोकेश शर्माला कंत्राट दिलं होतं ज्याचं नाव पनामा पेपर्समध्ये आहे. जर अरुण जेटलींनीच कंत्राट दिलेल्या व्यक्तीचं नाव पनामा पेपर्समध्ये असेल तर सरकार स्वतंत्र तपास कसा करु शकेल असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी विचारला आहे.
याप्रकरणी चौकशी करण्यासाठी सरकारने विविध तपासयंत्राणांच पथक तयार करावं, स्वतंत्र चौकशी होणं शक्यच नाही आहे. त्यामुळे अरुण जेटलींना तपासातून बाहेर ठेवावं अशी मागणी जयराम रमेश यांनी केली आहे. जयराम रमेश यांनी यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग यांच्या मुलाचं अभिषेक सिंगचं नावदेखील समोर आल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान काळा पैसा उघड करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सक्तवसुली संचलनालय (ईडी), केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडी) आणि महसूल गुप्तचर विभाग (डीआरआय) यांना पनामा कागदपत्रांची तपासाणी करण्याचे आदेश दिलेले आहेत.