नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणारे फलक जागोजागी लागले असून त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत आहे. सरकारला हे फलक काढण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. काँग्रेसने निवेदनात म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले व त्यांच्या सरकारची कामगिरी सांगणारे फलक देशभरात मुख्यत्वे पेट्रोलपंपांनजीक लावलेले आहेत. निवडणूक कार्यक्रम आयोगाने लागू केल्यानंतर लगेचच आचारसंहिताही लागू झाली. तिचा भंग होत असल्याने हे फलक तातडीने काढून टाकणे आवश्यक आहे. असे फलक झळकविणे ही जनतेच्या पैशाची उधळपट्टीही आहे. मोदी निवडणूक प्रचारासाठी सरकारी यंत्रणा व पैसे वापरत आहेत. आचारसंहिता लागू झाल्यावर सरकार, राजकीय पक्षांवरही अनेक बंधने येतात.आचारसंहितेचा बडगा लक्षात घेऊन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी चेन्नईहून दिल्लीला परत येताना विशेष विमानाचा वापर करणे टाळले होते. त्यांनी खासगी कंपनीच्या विमानाने प्रवास केला. या दक्षतेबद्दल त्यांचे सर्वांनीच कौतुक केले होते.आचारसंहितेआधी लावले फलकमोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणारे फलक आचारसंहिता लागू होण्याच्या काही आठवडे आधीच झळकविण्याचा चाणाक्षपणा दाखविण्यात आला होता. त्या वेळी आक्षेप घेता न आलेल्या काँग्रेसने आचारसंहिता लागू झाल्यानंतर मात्र हा मुद्दा धसास लावण्याचे ठरविले आहे.
मोदी सरकारचे फलक हटविण्याची काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 3:44 AM