नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या बँक खात्यात मोदी सरकारने जमा केलेली मदत अपुरी आहे. त्यामुळे सरकराने त्यांच्या खात्यात 7,500 रुपये टाकावेत. प्रत्येक जनधन खाते, पेन्शन खाते आणि पीएम शेतकरी खात्यात ही रक्कम सरकारने जमा करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या सल्लागार समितीची पहिली बैठक आज पार पडली. यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारकडे ही मागणी केली आहे.
असा आहे काँग्रेसचा प्लॅन काँग्रेस पक्षाच्या सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांसदर्भात जयराम रमेश यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, लघू आणि मध्यम उद्योगांचे पुनरुज्जीवन करणे, पीक खरेदी आणि स्थलांतराच्या समस्येवर काँग्रेस पक्षाने एक सविस्तर प्लॅन तयार केला आहे. हा प्लॅन 1 ते 2 दिवसांत मोदी सरकारला सोपवला जाईल.
जयराम रमेश म्हणाले, 'सरकारने आतापर्यंत जी पावले उचलली आहेत ती पुरेशी नाहीत. आम्हीही सरकारला सल्ला देणार आहोत. लघू आणि मध्यम उद्योगांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही एक ठोस प्लॅन तयार केला आहे. हा प्लॅन आम्ही लवकरच सरकारला सोपवणार आहोत. या बैठकीत मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही लघू आणि मध्यम उद्योगांना मदत देण्यावर जोर दिला आहे. तसेच काँग्रेस सल्लागार समितीची बैठक दर दुसऱ्या दिवशी होईल, असेही रमेश यांनी म्हटले आहे.
'एमपी सरकार पाडण्यातच व्यस्त होते मोदी सरकार' -मोदी सरकारने कोरोना महामारीचा सामना करण्याच्या तयारीवर लक्षच दिले नाही. त्यांचे लक्ष केवळ मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्यावरच होते, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.