रेवाडी : काँग्रेसने आपल्या चुकीच्या धोरणाने देशाचा नाश केला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेसवर निशाणा साधला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी हरयाणातील ऐलनाबाद आणि रेवाडीमध्ये सभेला संबोधित करताना मोदी बोलत होते.
मोदी म्हणाले की, काश्मिरातील कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होती; पण काँग्रेसने ७० वर्षांपर्यंत याबाबत काहीच केले नाही. आम्ही हे कलम रद्द केले. आपण जर मला पाच वर्षांसाठी स्थिर केले आहे, तर मी ही अस्थायी व्यवस्था का चालू देऊ? संसदेत १९६४ मध्ये एका चर्चेदरम्यान अशी मागणी पुढे आली होती की, कलम ३७० समाप्त करण्यात यावे आणि या मुद्यावर संसदेत चर्चा व्हावी.
त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी हात जोडून मागणी केली होती की, यावर विचार केला जावा आणि कलम ३७० समाप्त करण्यात यावे; पण हा विषय बाजूला ठेवला गेला. काय हतबलता होती? आणि काय खेळ खेळला जात होता? असा सवालही त्यांनी केला. ‘वन रँक वन पेन्शन’अंतर्गत केवळ हरयाणातच ९०० कोटी रुपये दिले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
करतारपूर कॉरिडॉरबाबतही मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, ७० वर्षे भाविकांना दुर्बिणीने करतारपूर साहिब गुरुद्धाराचे दर्शन करावे लागले. फाळणीच्या वेळी करतारपूर साहिब गुरुद्वारा भारतीय हद्दीत आणू न शकणे ही एक चूक होती.