काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आयकर विभागाने धीरज साहू य़ांचं घर आणि अनेक ठिकाणांहून 350 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. आता धीरज साहू यांनी गेल्या वर्षभरातील रिटर्नमध्ये सुधारणा करून 150 कोटी रुपयांचा कर भरल्याची माहिती समोर आली आहे.
उद्योगपती आणि राजकारणी असलेल्या धीरज साहू यांनी आता असा युक्तिवाद केला आहे की, जप्त केलेली काही रोख रक्कम चालू आर्थिक वर्षात केलेल्या व्यवसायाशी संबंधित आहे, ज्याचे रिटर्न फक्त पुढील आर्थिक वर्षात भरायचे आहेत. उर्वरित 50 कोटींच्या रकमेबाबत कोणतीही ठोस माहिती नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. यावर आयकर विभाग दंड आणि कर लावणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस खासदार म्हणाले की, ही रोख रक्कम बिझनेस टर्नओव्हरचा भाग आहे. एकूण 50 कोटी रुपयांच्या रोख रकमेबाबत ते काहीही सांगू शकत नाहीत. त्यांना कर आणि दंड भरावा लागेल. आयकर नियमांच्या अंतर्गत, मूळ टॅक्स रिटर्नमध्ये कोणत्याही चुका किंवा गहाळ तपशील दुरुस्त करण्यासाठी रिटर्नमध्ये दुरुस्तीची परवानगी आहे.
डिसेंबरमध्ये धीरज साहूशी संबंधित असलेल्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. यामध्ये 351 कोटी रुपयांहून अधिक किमतीची रोख रक्कम आणि 2.8 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे बेहिशेबी दागिने जप्त करण्यात आले आहेत. कारवाई पूर्ण झाल्यानंतर विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 329 कोटी रुपयांच्या रोख रकमेचा मोठा भाग ओडिशाच्या छोट्या शहरांमधून जप्त करण्यात आला आहे.