काँग्रेसला युपीमध्ये प्रदेशाध्यक्ष मिळेना; प्रियांका गांधी यांची ऑफर पाच नेत्यांनी नाकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 12:21 PM2022-06-29T12:21:54+5:302022-06-29T12:22:18+5:30
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजय कुमार लल्लू यांनी चार महिन्यांपूर्वीच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांची जागा घेण्यास काँग्रेसचा एकही नेता तयार नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष कोणाला नियुक्त करावे, असा प्रश्न काँग्रेससमोर निर्माण झाला आहे.
आदेश रावल -
नवी दिल्ली :काँग्रेसच्याउत्तर प्रदेश प्रभारी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांना प्रदेशाध्यक्ष मिळत नाही. त्यांनी पाच नेत्यांना प्रदेशाध्यक्ष होण्याचा प्रस्ताव दिला, परंतु सर्वांनी नकार दिला. गेल्या चार महिन्यांपासून हे पद रिक्त आहे. मात्र, ती जबाबदारी घेण्यास एकही नेता तयार नसल्याचे चित्र उत्तर प्रदेशमध्ये निर्माण झाले आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजय कुमार लल्लू यांनी चार महिन्यांपूर्वीच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांची जागा घेण्यास काँग्रेसचा एकही नेता तयार नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष कोणाला नियुक्त करावे, असा प्रश्न काँग्रेससमोर निर्माण झाला आहे.
१० मार्च रोजी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते. काँग्रेसचा या पाचही राज्यांत पराभव झाला. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्या नेतृत्त्वात लढविली होती. उर्वरित चार राज्ये पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूर येथेही काॅंग्रेसला अपयशच हाती आले हाेते. त्यानंतर तेथील प्रदेशाध्यक्ष तातडीने बदलण्यात आले. परंतु उत्तर प्रदेशबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. राज्यात पक्षाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले होते. यातील एक आमदार आराधना मिश्रा (मोना) या प्रमोद तिवारी यांच्या भगिनी असून, त्यांना विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यात आले. दुसरे आमदार वीरेंद्र चौधरी यांनी प्रदेशाध्यक्ष होण्यास नकार दिला. त्यामुळे या पदावर कोणाची निवड करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रदेशाध्यक्षपदासाठी या नेत्यांचा नकार -
माजी राज्यसभा सदस्य व छत्तीसगढचे प्रभारी पी. एल. पुनिया, राजस्थानमधून नुकतेच राज्यसभेसाठी निवडले गेलेले प्रमोद तिवारी, माजी प्रदेशाध्यक्ष निर्मल खत्री, माजी विधिमंडळ नेते प्रदीप माथूर व आ. वीरेंद्र चौधरी यांना प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु सर्वांनी नकार दिला.