शीलेश शर्मा, नवी दिल्लीगेल्या एक महिन्यापेक्षा जास्त काळ अज्ञातवासात असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे १९ एप्रिल रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर आयोजित ‘किसान-मजदूर रॅली’ला पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत मार्गदर्शन करणार आहेत. या रॅलीतील राहुल यांचे भाषण अगदी वेगळ्या शैलीचे असेल, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, नेतृत्वावरून काँग्रेसमधील मतभेद सोमवारी पुढे आले.राहुल हे अज्ञातवासामध्ये भाषणकला व वक्तृत्व शैली शिकण्यासाठी जगातील नामवंत विशेषज्ज्ञांकडून जमावाला सामोरे जाणे व संभाषण कौशल्यातून लोकांचे मने जिंकण्याचे प्रशिक्षण घेत होते, असे संकेत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळाले आहेत. राहुल आता नव्या रूपात जगासमोर प्रकटतील, या सलमान खुर्शीद यांच्या विधानामुळे ते वक्तृत्व व संभाषण कला शिकत असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला.भूसंपादन विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसने आपली सर्व शक्ती पणाला लावण्याचे ठरविले आहे. १९ एप्रिलच्या रॅलीचे व्यासपीठ हे काँग्रेसच्या शक्तिप्रदर्शनासोबतच राहुल गांधींच्या नव्या रूपातील परतण्याचेही व्यासपीठ असेल. या रॅलीला राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याचे रॅलीचे प्रभारी व काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी सांगितले. सोनिया या स्वत: मोर्चा सांभाळत विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत थेट बोलणी करीत आहेत. जनता परिवाराच्या धर्तीवर आता बाहेर पडलेल्या पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसमध्ये सामील व्हायला पाहिजे, असे मत दिग्विजयसिंग यांनी व्यक्त केले. तृणमूल, राष्ट्रवादीसह जुन्या काँग्रेसी पक्षांनी सोनियांच्या नेतृत्वात एकजूट होण्याची गरज आहे. भविष्यात राहुल यांना पक्षाचे अध्यक्ष बनविण्यात आले तरी सोनिया याच सर्वमान्य नेत्या राहतील. तथापि राहुल गांधींना धुरा सोपविण्याबाबतचा निर्णय सोनिया गांधी यांनीच घ्यावयाचा आहे, असे ते म्हणाले.
नेतृत्वाच्या मुद्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद
By admin | Published: April 07, 2015 3:58 AM