भोपाळ: मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राज्यात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारपासून एकता यात्रेला प्रारंभ केला. मात्र, ही यात्रा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ओरछा येथून ही यात्रा सुरू झाली. त्यावेळी काँग्रेसचा एक वृद्ध कार्यकर्ता 'दिग्गी राजा जिंदाबाद' अशी घोषणा देत होता. मात्र, ही घोषणा ऐकून दिग्विजय सिंह यांना प्रचंड राग आला. त्यांनी जवळ जाऊन संबंधित कार्यकर्त्याला चांगलेच झापले. पुन्हा अशी घोषणा दिलीस तर तुला इथेच नदीत बुडवेन, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले. दिग्विजय सिंहांचा हा रुद्रावतार पाहून कार्यकर्ता चांगलाच घाबरला. त्याने कान पकडून दिग्विजय सिंह यांची माफी मागितली. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. वृद्ध व्यक्तीला अशी वागणूक दिल्यामुळे अनेकजण दिग्विजय सिंह यांच्यावर टीकाही करत आहेत. अलीकडे काँग्रेसने अंगिकारलेल्या सॉफ्ट हिंदुत्त्वाच्या रणनीतीचा भाग म्हणून दिग्विजय सिंह यांच्या एकता यात्रेची सुरुवात ओरछा येथील राम मंदिरापासून झाल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. मध्य प्रदेशात 2003 साली उमा भारती यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपाने काँग्रेसचा दारूण पराभव केला होता. त्यावेळी दिग्विजय सिंह यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दिग्विजय सिंह यांनी एकही निवडणूक लढवली नव्हती. मात्र, या काळात काँग्रेसने दिग्विजय सिंह यांना राज्यसभेवर पाठवून महासचिवपदाची जबाबदारी दिली होती. मात्र, आता दिग्विजय सिंह पुन्हा एकदा मध्य प्रदेशच्या राजकारणात सक्रीय होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपाचे नेते सतर्क झाले असून त्यांनी दिग्विजय यांना लक्ष्य करण्याची रणनीती आखायला सुरुवात केली आहे.
VIDEO: पुन्हा असली घोषणा दिलीस तर नदीत बुडवेन; दिग्विजय सिंहांनी वृद्धाला झापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 5:43 PM