आदेश रावल नवी दिल्ली : जी-२०च्या निमित्ताने जगभरातील सर्व नेत्यांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले असताना काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना डिनरचे निमंत्रण न दिल्याने काँग्रेस नाराज आहे.
काँग्रेसने म्हटले आहे की, आम्ही लोकशाही देशाच्या सरकारची कल्पना करू शकत नाही की, जिथे जागतिक नेत्यांसाठी आयोजित डिनरला विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केले जात नाही. यावर भाजपने म्हटले आहे की, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनाही निमंत्रण नव्हते. खरगे हे काँग्रेस अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनाही नव्हते.
डिनरला कोण येणार? : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन डिनरला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसशासित चार राज्यांचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भूपेश बघेल, सिद्धरामय्या आणि सुखविंदर सिंह सुक्खू यांना आमंत्रणे मिळाली; पण ते उपस्थित राहणार नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे जी-२० शिखर परिषदेत सहभागी झालेल्या जागतिक नेत्यांचे स्वागत केले. मोदी ज्या ठिकाणी पाहुण्यांचे स्वागत करत होते, त्या ठिकाणच्या पार्श्वभूमीवर कोणार्क मंदिराचे सूर्यचक्र होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन तेथे पोहोचल्यावर मोदींनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी बायडेन यांची नजर चक्रावर पडताच पंतप्रधानांनी त्यांचा हात धरला आणि सूर्यचक्राबद्दल सांगायला सुरुवात केली. बायडेनही त्यांचे म्हणणे ऐकताना दिसले.