काँग्रेसचा राज्यातील वाद पोहोचला दिल्लीत, मंत्री सुनील केदार राजधानीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 02:23 PM2021-08-25T14:23:23+5:302021-08-25T14:24:44+5:30
आमदार देशमुख यांच्या लेटरबॉम्बचे पडसाद राज्यातील काँग्रेसमध्ये उमटले आहेत. विशेष म्हणजे देशमुख यांच्या आरोपानंतर मंत्री सुनील केदार तात्काळ दिल्लीत दाखल झाले आहेत.
मुंबई - काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. क्रीडामंत्रीसुनील केदार व माजी आमदार आशिष देशमुख यांच्यातील परंपरागत राजकीय युद्धाला गेल्या काही वर्षांत विराम लागला होता. मात्र, एका खुर्चीवरून पुन्हा एकदा या संघर्षात ठिणगी पडली आहे. काटोलच्या आढावा बैठकीत शेजारच्या खुर्चीत बसलेल्या देशमुखांना केदारांनी सर्वांसमक्ष उठवले. खुर्चीसाठी झालेल्या अपमानातून देशमुख रुसले आणि दुसऱ्याच दिवशी घोटाळेबाज केदारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी करणारा लेटरबॉम्ब त्यांनी टाकला. खुर्चीच्या या किस्स्याची राजकीय वर्तुळात जोरात चर्चा रंगली आहे.
आमदार देशमुख यांच्या लेटरबॉम्बचे पडसाद राज्यातील काँग्रेसमध्ये उमटले आहेत. विशेष म्हणजे देशमुख यांच्या आरोपानंतर मंत्रीसुनील केदार तात्काळ दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे, दिल्ली दरबारी या अंतर्गात वादावर चर्चा होणार, असे दिसून येते. या दौऱ्यात केदार पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांना भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे, देशमुख-केदार वादावर काय तोडगा निघतो का, हे पाहावे लागणार आहे.
आमदार देशमुख कशामुळे नाराज झाले
आशिष देशमुख यांनी गेल्या काही दिवसांपासून आपला मोर्चा पुन्हा एकदा काटोल मतदारसंघाकडे वळविला आहे. शनिवार, २१ जुलै रोजी पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी काटोल व नरखेड येथे विविध विकासकामांच्या आढावा बैठका घेतल्या. या बैठकांना जिल्हा परिषदेचे पदाधकारी, अधिकारी, स्थानिक उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सरपंच यांना निमंत्रित करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता काटोल तहसील कार्यालयात आयोजित बैठकीसाठी केदार यांच्यापाठोपाठ आशिष देशमुख पोहचले व मंचावर केदार यांच्या बाजूच्या खुर्चीत बसले. ती खुर्ची जि.प. अध्यक्षांसाठी राखीव होती. याशिवाय दोन खुर्च्या जि.प. सभापतींसाठी राखीव होत्या.
केदार यांनी देशमुख यांना लगेच टोकले. ही जिल्हा परिषद व सरपंचांची आढावा सभा आहे. त्यामुळे येथे संबंधित पदाधिकारी बसतील, असे सांगितले. हे ऐकूण देशमुख खुर्चीवरून उठले व शेवटून दुसऱ्या खुर्चीत जाऊन बसले. पुढे त्यांना बैठकीत बोलण्याचीही संधी मिळाली नाही. सरपंचांसमोर आपला अपमान झाला हे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून स्पष्ट जाणवत होते. बैठकीतही याची कुजबुज सुरू झाली होती. शेवटी तासभर बसून देशमुख निघून गेले. यानंतर दुपारी ३.३० वाजता देशमुख नरखेडच्या बैठकीत पोहचले. येथे मात्र ते मंचावर न जाता समोर सरपंचांमध्ये जाऊन बसले. येथेही त्यांना मंचावर खुर्ची मिळाली नाही. या घटनाक्रमामुळे देशमुख कमालीचे दुखावले.
केदारांचा काटोल विधानसभेच्या दौराही खटकला
काटोल- नरखेडच्या आढावा बैठकीनंतर केदार यांनी रात्री पावणेदोन वाजेपर्यंत काटोल मतदारसंघातील सुमारे डझनभर गावांचा दौरा केला. या दौऱ्यात केदारांसोबत पदाधिकाऱ्यांचा फौजफाटा होता. मात्र, आशिष देशमुख याही दौऱ्यात नव्हते. केदार यांचा हा दौराही देशमुख यांना चांगलाच खटकला व त्यांच्या रोषात आणखीणच भर पडली, असे देशमुख यांच्या निकटवर्तीय सूत्राने सांगितले.
देशमुख दुसऱ्याच दिवशी पालकमंत्र्यांच्या भेटीला
शनिवारच्या घटनाक्रमानंतर रविवारी सकाळी देशमुख यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांची त्यांच्या बेझनबाग येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली. दुपारनंतर लागलीच देशमुख यांनी जिल्हा बँक घोटाळ्यावरून केदार यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. देशमुख-राऊत यांची ही भेट पूर्वनियोजित होती की आकस्मिक, या भेटीत देशमुख यांनी केदारांकडून मिळालेल्या वागणुकीची तक्रार केली का, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून केदार-राऊत यांच्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष पाहता देशमुखांना राऊत यांचे तर पाठबळ नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.