मुंबई - येत्या 8 फेब्रुवारी रोजी दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने सर्वप्रथम आपल्या 70 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजप उमेदवारांची यादीही तयार होत आहे. त्याचवेळी काँग्रेसचे दिग्गज नेते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात माघार घेताना दिसत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानंतरही निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष अजय माकन आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली आहे.
2015 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नव्हता. त्यावेळी दिल्लीतील जनतेने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्षावर डोळे बंद करून विश्वास ठेवला होता. आपने 67 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला तीन जागांवर विजय मिळवता आला होता.
निवडणुकीपूर्वी दिल्लीत काँग्रेसला दोन धक्के बसले आहेत. दिग्गज नेते महाबल मिश्रा यांचे पुत्र विनय मिश्रा यांनी आपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना द्वारका येथून तिकीट देण्यात आले आहे. तर पाच वेळा आमदार राहिलेले शोएब इकबाल यांनी देखील आपमध्ये प्रवेश केला आहे.