हैदराबाद - एआयएमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसच्या विजयावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला पराभूत करायचे असेल तर सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचं आहे. आगामी 2019 च्या निवडणुकीत मोदींचा पराभव करता येईल, एवढी क्षमता काँग्रेसमध्ये नाही, असेही ओवैसींनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे तेलंगणातील विजयानंतर आणि इतर तीन राज्यात काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर ओवैसींनी काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे.
असुदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने तेलंगणात 7 जागांवर विजय मिळवत घवघवीत यश संपादन केलं. तर प्रचारसभांमध्येही ओवैसींनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर टाका केली होती. आता, काँग्रेसला मिळालेल्या यशानंतरही ओवैसींनी काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे. भाजपला पराभूत करायचे असल्यास सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. काँग्रेस आणि भाजपेत्तर पक्षांनी एकत्र येऊन आगामी निवडणूक लढवावी. भाजपला पराभूत करणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. काँग्रेस हा देशासाठी पर्याय ठरू शकत नाही. भाजपला पराभूत करायचे असेल आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनण्यापासून रोखायचे असेल तर भाजपाविरोधी सर्वच पक्षांनी एकत्र यायला हवं. कारण, एकट्या काँग्रेसजवळ ती क्षमता नाही, असे ओवैसींनी म्हटले आहे. तसेच तेलंगणातील विजयाबद्दल समाधान व्यक्त करत चंद्रशेखर राव यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. चंद्रशेखर राव हे भाजपाविरोधी सर्वच पक्षांची एकत्र मोट बांधतील आणि भाजपच्या पराभवाचा पाया रचतील, असेही ओवैसी म्हणाले.
दरम्यान, तेलंगणात ओवैसींच्या पक्षाला 7 जागांवर विजय मिळाला असून भाजपाला केवळ एक जागा जिंकता आली आहे. तर काँग्रेसलाही तेलंगणात म्हणावे तितके यश आले नाही. त्यामुळे काँग्रेसने तीन राज्यात जरी यश मिळवले असले तरी, या यशामुळे ते मोदींना पराभूत करू शकत नाहीत, असेच ओवैसींनी सूचवले आहे.