७० वर्ष ज्यांनी अन्याय केला, ते आता 'न्याय' करणार का? - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 06:06 PM2019-04-16T18:06:27+5:302019-04-16T18:07:58+5:30
जवाहरलाल नेहरुंपासून इंदिरा गांधी आणि मनमोहन सरकारपर्यंत देशातील जनतेवर काँग्रेसने अन्याय केला ते गरिबांना न्याय काय देणार? अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केली आहे
नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरुंपासून इंदिरा गांधी आणि मनमोहन सरकारपर्यंत देशातील जनतेवर काँग्रेसने अन्याय केला ते गरिबांना न्याय काय देणार? अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसवर केली आहे. देशातील या नामदार कुटुंबाने गरिबी हटावचा नारा देऊन गरिबांच्या मतांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला असा टोला नरेंद्र मोदी यांनी गांधी कुटुंबाचं नाव न घेता लगावला आहे.
देशाची निवडणूक ही लोकांवर केंद्रित झाली आहे. पाच वर्षाने देशाने इतकी प्रगती केली आहे की आता लोकांनी विचार करायचा आहे. देशाला पुढे घेऊन जायचं आहे की मागे परत आणायचं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना देशातील लोकांपुढे आत्मविश्वास आहे. २०१४ ते २०१९ हा काळ देशातील जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी होता तर २०१९ नंतरचा काळ भारताला जगात सर्वात पुढे नेण्याचा आहे असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मोदी बोलत होते.
या मुलाखतीत बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी मोदी म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७० वर्षामध्ये काँग्रेसला गरिबी हटवता आली नाही, आता ते सांगतात न्याय होणार? देशातून काँग्रेस हटेल तेव्हाच न्याय होईल. २६/११ नंतर भारतीय हवाई दलाने स्ट्राईक करायला हवं होतं. काँग्रेसने आदेश देऊन न्याय केला का? १९८४ च्या शिख दंगलीतील आरोपींना शिक्षा देऊन जनतेशी न्याय केला का? काँग्रेसच्या अन्यायाची यादी मोठी आहे ते सांगितलं तर भलीभोठी यादी बनेल ते आता जनतेला सांगत आहेत आता होणार न्याय? असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसकडून गरिबांसाठी न्याय ही योजना आणण्याचं आश्वासन देण्यात आलंय, जर देशात काँग्रेसचं सरकार आलं तर गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. काँग्रेसच्या याच न्याय योजनेवर पंतप्रधानांनी टीका केली आहे.