आगामी लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी ऑनलाइन देणग्या गोळा करण्यासाठी काँग्रेसने 'डोनेट फॉर देश' नावाची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काल १८ डिसेंबरला या मोहिमेची सुरुवात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. पण या मोहिमेत काही तासातच तांत्रिकदृष्ट्या अडचणी आल्या. काँग्रेसने क्राउडफंडिंग मोहीम सुरू केली, पण 'देशासाठी देणगी' डोमेनची नोंदणी केली नाही. 'डोनेट फॉर देश' हे डोमेन भाजपच्या नावावर आधीच नोंदणीकृत आहे. DonateforDesh.org वर क्लिक केल्यावर देणगीदारांना भाजपच्या डोनेशन पेजवर नेले जात होते. तर DonateForDesh.com वापरकर्त्यांना OpIndia वेबसाइटच्या सबस्क्रिप्शन पेजवर घेऊन जाते.
'देशासाठी देणगी' मोहिमेसाठी काँग्रेसकडे उपलब्ध असलेले डोमेन donateinc.net आहे. यावर क्लिक केल्यावर इंडियन नॅशनल काँग्रेसचे पेज ओपन होते आणि काही फोटोंसह १३८, १३८०, १३८०० रुपये देण्याचे सांगितले जाते. दरम्यान, आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसने भाजपवर त्याची 'कॉपी' करून 'लोकांना भ्रमित करण्यासाठी बनावट डोमेन तयार केल्याचा' आरोप केला आहे.
काँग्रेस नेत्ये आणि पक्षाच्या सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेट यांनीही आरोप केले. त्या म्हणाल्या, सर्वात जुन्या पक्षाने देणगी मोहीम सुरू केल्याने भाजप घाबरली आहे. काँग्रेसने धर्मादाय अभियान सुरू केल्यानंतर भाजपने बनावट डोमेन तयार करून त्यांचे डावपेच सुरु केले. तुम्ही फक्त http://donateinc.in वरून काँग्रेसच्या कार्यासाठी देणगी देऊ शकता. तसे, माझी कॉपी केल्याबद्दल धन्यवाद, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी सांगितले की, मोहिमेच्या पहिल्या दिवशी १ कोटी १७ लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. अजय माकन यांनी सर्व देणगीदारांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आणि म्हणाले, 'तुमचे योगदान वंचितांच्या चळवळीला बळकटी देते आणि सर्वसमावेशक भारताप्रती आमचे नाते अधिक मजबूत करते'.
पक्षाच्या क्राउडफंडिंग मोहिमेचा शुभारंभ करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, जे पक्ष चालवण्यासाठी श्रीमंत लोकांवर अवलंबून असतात त्यांना त्यांची धोरणे पाळावी लागतात. खरगे म्हणाले की, काँग्रेस देशासाठी पहिल्यांदाच लोकांकडून देणगी मागत आहे. महात्मा गांधींनीही स्वातंत्र्यलढ्यात जनतेकडून देणग्या घेतल्या होत्या. या मोहिमेचे उद्दिष्ट 'समान संसाधन वितरण आणि संधींसह समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी पक्षाला सक्षम करणे' आहे.