Delhi Assembly Elections Result: दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या मुख्यालयात पोहोचले होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी आम आदमी पक्षासोबतच काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवला. ज्याने दिल्ली लुटली त्याला परत करावी लागेल. कॅगचा अहवाल विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात मांडला जाणार असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी अरविंद केजरीवाल यांना इशारा दिला. दुसरीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पराभवाची डबल हॅटट्रिक झाल्याचे म्हणत पंतप्रधानांनी राहुल गांधी यांनाही लक्ष्य केलं. भाजपचं मतं मिळवण्यासाठी काँग्रेसने हिंदू बनण्याचा प्रयत्न केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा शून्य जागा मिळाल्या. भाजपच्या मुख्यालयातून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावरुनच काँग्रेसवर निशाणा साधला. देशाच्या राजधानीत सर्वात मोठ्या पक्षाने शून्याची दुहेरी हॅटट्रिक केली आहे. गेल्या तीन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे सर्वात जुन्या पक्षाने शून्याची दुहेरी हॅटट्रिक केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
काँग्रेस पक्ष सोबत असलेल्यांना बुडवतो
"देशातील सर्वात जुन्या पक्षाने सलग सहावेळा देशाची राजधानी दिल्लीत आपले खाते उघडले नाही. त्यांचे लोक पराभवाचे गोल्ड मेडल घेऊन फिरत आहेत. काँग्रेस पक्ष जो सोबत असेल त्याला बुडवतो. काँग्रेसने आपल्या साथीदारांनाही बुडवले आहे. आजची काँग्रेस आपली भाषा आणि आपला अजेंडा चोरण्यात व्यस्त आहे. काँग्रेस त्यांच्या मित्रपक्षांकडून मुद्दे चोरते आणि नंतर त्यांच्याच व्होटबँकेला रोखते," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
दिल्लीत इंडिया आघाडी काँग्रेसच्या विरोधात
"आता काँग्रेसची नजर राज्यांतील पक्षांवर आहे. इंडिया आघाडीच्या पक्षांना आता काँग्रेसचे चरित्र कळू लागले आहे. ज्या व्होटबँकमधून ते जिंकत आहेत ती काँग्रेस परत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे मित्रपक्षांना समजू लागले आहे. दिल्लीतही हे दिसून आले आहे. दिल्ली निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात इंडिया आघाडीने निवडणूक लढवली होती. काँग्रेसला रोखण्यात ते यशस्वी झाले, पण आपदाला वाचवण्यात त्यांना यश आले नाही. आजची काँग्रेस ही स्वातंत्र्य चळवळीच्या काळात होती तशी राहिलेली नाही," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
काँग्रेसमध्ये अर्बन नक्षलवादाचा डीएनए
"आजची काँग्रेस राष्ट्रहिताचे नाही तर शहरी नक्षलवाद्यांचे राजकारण करत आहे. काँग्रेसचे नेते भारताशी लढत असल्याचे सांगतात तेव्हा ती नक्षलवाद्यांची भाषा असते. समाज आणि देशात अराजकता आणण्याची ही भाषा आहे. इकडे दिल्लीत आपदाही याच शहरी नक्षलवादी विचारसरणीला पुढे नेत होती. काँग्रेसची शहरी नक्षलवादी विचारसरणी देशाच्या विचारसरणीवर हल्ला करते. शहरी नक्षलवाद्यांचा डीएनए काँग्रेसमध्ये शिरला आहे, अस आरोप पंतप्रधान मोदींनी केला.
"काँग्रेसने २०१४ नंतर ५-७ वर्षे हिंदू होण्याचा प्रयत्न केला. मंदिरात गेले, हार घातले. असे करून भाजपची व्होट बँक फोडून काही मते मिळतील, असे त्यांना वाटले. पण काहीही न मिळाल्याने त्यांनी हे कामही बंद केले. हा भाजपचे काम आहे आणि इथं आपलं काही होणार नाही हे त्यांना समजलं, असं पंतप्रधानांनी म्हटलं.