नवी दिल्ली / लखनऊ : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सायकलवर काँग्रेस डबलसीट बसणार, हे मंगळवारी निश्चित झाले आहे. समाजवादी पक्षाशी आघाडी करण्याचे निश्चित असून, त्याबाबतचा समझोता दोन दिवसांत होईल, असे गुलाम नबी आझाद यांनी मंगळवारी स्पष्ट केले, तर काँग्रेससह अन्य पक्षांशी महाआघाडी करण्याबाबत निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे मत मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले. सपाशी समझोता झाल्यास आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत राहणार नाही, हे शीला दीक्षित यांचे विधान राज्यात काँग्रेस महाआघाडी करणार असल्याचे द्योतक आहे. याबाबत लखनऊमध्येच एक-दोन दिवसांत घोषणा होईल, असे अखिलेश यांनीही सांगितले. मुलायमसिंह यादव हेच पक्षाचे संस्थापक आणि चेहरा आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका लढविल्या जातील, असे अखिलेश यांनी मंगळवारी पक्षनेते व कार्यकर्त्यांपुढे पुन्हा स्पष्ट केले. मात्र ते विधान त्यांनी मोघमच ठेवले. प्रत्यक्षात मुलायमसिंह भलतेच अडचणीत असून, त्यांच्याकडे आता ना निवडणूक चिन्ह आहे, ना कोणताच पक्ष. नवा पक्ष स्थापन करायलाही त्यांना वेळ शिल्लक नाही. बहुधा त्यामुळेच त्यांनी आज ३८ जणांची नावे अखिलेश यांच्याकडे पाठवली आणि त्यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी विनंती केली. त्यातील किती जणांना अखिलेश उमेदवारी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र दोन्ही याद्यांतील ९० टक्के उमेदवार सारखे आहेत. मुलायम यांचा गट स्वतंत्रपणे निवडणुका लढवेल का, हेही नक्की नाही. मात्र लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला, तर त्यांना आता लोकदल हा पक्ष आणि त्याचे शेत नांगरणारा शेतकरी हेच चिन्ह घ्यावे लागेल.अखिलेश समर्थकांसमोर म्हणाले की, येत्या काही दिवसांत महाआघाडीला अंतिम स्वरूप देण्यात येईल. उमेदवारांची अंतिम यादी एक ते दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल. राज्यात पुन्हा समाजवादी पक्षाचे सरकार आणणे हेच आपले लक्ष्य आहे. आयोगाचा निर्णय अखिलेश यांच्या बाजूने आल्यानंतर अखिलेश यांनी सोमवारीच मुलायमसिंह यांची भेट घेतली होती. टिष्ट्वटरवर तीन फोटोही त्यांनी पोस्ट केले होते. ‘सायकल चलती जाएगी, आगे बढती जाएगी’ असे टिष्ट्वट त्यांनी सोमवारीच केले होते. मंगळवारीही त्यांनी वडिलांची भेट घेतली. (लोकमत न्यूज नेटवर्क)रामगोपाल यांच्याकडून सुप्रीम कोर्टात ‘कॅव्हिएट’अखिलेश यांचा गटच खरा समाजवादी पक्ष असल्याचे ठरवून, ‘सायकल’ हे निवडणूक चिन्ह या गटास देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला मुलायमसिंह अंतरिम स्थगिती घेण्याची शक्यता लक्षात घेऊन पक्षाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हिएट’ दाखल केला. आयोगाच्या निर्णयाविरुद्ध मुलायमसिंह अथवा त्यांच्या गटाने प्रकरण दाखल केले तरी त्यावर आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय कोणताही अंतरिम आदेश देऊ नये, अशी विनंती त्यात केली आहे. >उमेदवार लवकरच निश्चित करणार सायकल चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा आत्मविश्वास होता असे सांगून अखिलेश म्हणाले की, उमेदवारांची यादी मी लवकरच निश्चित करणार आहे. वडिलांसोबतचे संबंध कदापिही संपुष्टात येऊ देणार नाही. त्यांच्याशी माझे नाते अतूट आहे.
‘सायकल’वर काँग्रेस डबलसीट
By admin | Published: January 18, 2017 6:33 AM