अध्यक्ष निवडीबाबत Congress कार्यकारिणीची १६ ऑक्टोबरला बैठक, राजकीय स्थितीवरही विचारमंथन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 07:11 AM2021-10-10T07:11:37+5:302021-10-10T07:12:30+5:30
Congress,Politics: काँग्रेसमधील कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद आदी नाराज नेत्यांनी अशी बैठक बोलाविण्याची केलेली मागणी पक्षश्रेष्ठींनी मान्य केली.
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष निवडणे, सध्याची राजकीय स्थिती तसेच पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी त्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची येत्या शनिवारी, १६ ऑक्टोबर रोजी बैठक होणार आहे. काँग्रेसमधील कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद आदी नाराज नेत्यांनी अशी बैठक बोलाविण्याची केलेली मागणी पक्षश्रेष्ठींनी मान्य केली.
यासंदर्भात काँग्रेसने एका निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक येत्या शनिवारी सकाळी १० वाजता सुरू होईल. त्या पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, काँग्रेसमध्ये विविध पदांसाठी पक्षांतर्गत निवडणुका घेण्याबाबतही विचार केला जाणार आहे. काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड तसेच इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तत्काळ बैठक बोलवावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांनी नुकतीच केली होती. पंजाबमध्ये दुफळी वारंवार उघड होत आहे. त्या राज्यात कॅ. अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून त्या जागी चरणजितसिंग चन्नी यांची निवड करण्यात आली. अमरिंदरसिंग व पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सिद्धू यांच्यातील मतभेद खूप ताणले गेले होते. अमरिंदरसिंग यांना हटविल्यानंतरही मतभेदांमुळे सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता व नंतर तो मागे घेतला.
खटकणाऱ्या गोष्टींबाबत आवाज उठविणार
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल म्हणाले होते की, काँग्रेसमधील नाराज २३ नेत्यांना जी-२३ म्हणून ओळखले जाते. आम्ही जी-२३ आहोत; पण जी हुजूर-२३ नाही.
-खटकणाऱ्या गोष्टींबाबत आम्ही नेहमी आवाज उठविणार. कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती.