नवज्योतसिंग सिद्धूंच्या विश्वासू नेत्याची पक्षातून हकालपट्टी, नवीन प्रदेशाध्यक्षांवरील आरोप भोवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 11:35 AM2022-04-11T11:35:51+5:302022-04-11T11:39:17+5:30

Congress expels Navjot Singh Sidhu loyalist Surjit Dhiman : पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अमरिंदर राजा वड़िंग यांच्या नियुक्तीला सुरजितसिंग धीमान यांनी विरोध केला होता.

congress expelled sidhu loyalist ex mla surjit dhiman for calling new punjab president inexperienced and corrupt | नवज्योतसिंग सिद्धूंच्या विश्वासू नेत्याची पक्षातून हकालपट्टी, नवीन प्रदेशाध्यक्षांवरील आरोप भोवले

नवज्योतसिंग सिद्धूंच्या विश्वासू नेत्याची पक्षातून हकालपट्टी, नवीन प्रदेशाध्यक्षांवरील आरोप भोवले

Next

चंडीगड : पंजाबचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे विश्वासू सुरजीतसिंग धीमान यांची काँग्रेस हायकमांडने पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवायांसाठी त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अमरिंदर राजा वड़िंग यांच्या नियुक्तीला सुरजितसिंग धीमान यांनी विरोध केला होता. त्यांनी अमरिंदर राजा वड़िंग यांना भ्रष्ट म्हटले होते. दरम्यान, सुरजीतसिंग धीमान यांच्या या हकालपट्टीकडे पक्षाचे आदेश न पाळणाऱ्या नेत्यांना एकप्रकारे इशारा म्हणून पाहिले जात आहे. सुरजीतसिंग धीमान अमरगढमधील काँग्रेसचे माजी आमदार आहेत.

आगामी काळात इतरांवरही अशीच कारवाई होण्याची शक्यता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाकारली नाही. अमरिंदर राजा वड़िंग यांना भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जावे लागले होते, असे म्हणत सुरजितसिंग धीमान यांनी नवीन पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच, एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुरजित धीमान म्हणाले होते की, अमरिंदर राजा वड़िंग यांची पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा पक्ष हायकमांडचा निर्णय योग्य नाही. ते भ्रष्ट आणि संधीसाधू आहेत.

याचबरोबर, अमरिंदर राजा वड़िंग यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनवण्याच्या निर्णयाला सुरजीतसिंग धीमान यांनी पंजाबच्या विरोधात म्हटले आहे. नव्या अध्यक्षांना जनतेचा पाठिंबा नाही. पंजाबचे काँग्रेस कार्यकर्ते अमरिंदर राजा वड़िंग यांना अध्यक्ष म्हणून स्वीकारणार नाहीत.अमरिंदर राजा वड़िंग हे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांच्यावर इतर राज्यात तिकिटे विकल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे त्यांच्याकडून आपण फार अपेक्षा करू शकत नाही, असेही सुरजीतसिंग धीमान यांनी म्हटले होते. 

विशेष म्हणजे, पंजाब विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या खराब कामगिरीनंतर काँग्रेस हायकमांडने प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यानंतर राज्यात नव्याने काँग्रेस संघटना तयार होत आहे. फक्त नवज्योतसिंग सिद्धूच नव्हे तर त्यांचे निकटवर्तीय सुखपाल सिंग खैरा यांच्यासारख्या अनेक नेत्यांना पक्षाने दुर्लक्षित केले आहे. हे सर्व पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी हायकमांडकडून लॉबिंग करत होते. काँग्रेसने प्रतापसिंग बाजवा यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनवले आहे आणि भारत भूषण आशू यांना कार्याध्यक्ष म्हणून घोषित केले आहे. तर राजकुमार चब्बेवाल यांना विधानसभेत उपनेते बनवण्यात आले आहे.

Web Title: congress expelled sidhu loyalist ex mla surjit dhiman for calling new punjab president inexperienced and corrupt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.