नवी दिल्ली, दि. 9 - काँग्रेस आणि पर्यायानं अहमद पटेलांसाठी अटीतटीच्या झालेल्या राज्यसभा निवडणुकीत बंडखोरी करणा-या 8 आमदारांना काँग्रेसनं बाहेरचा रस्ता दाखवला आहे. गुजरातमधील काँग्रेसच्या 8 बंडखोर आमदारांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत या आमदारांचं निलंबन केलं आहे.राज्यसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे आमदारांवर कारवाई केलीय, अशी माहिती गुजरात काँग्रेसचे प्रभारी अशोक गेहलोत यांनी दिली आहे. तसेच येत्या काही दिवसांत आणखी 6 आमदारांची हकालपट्टी होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांनी पक्षाचा व्हिप झुगारून अहमद पटेलांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला मतदान केलं होतं. त्यामुळे काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र अनेक वळणे घेतल्यानंतर बुधवारी मध्यरात्री पावणे दोन वाजता निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यात अहमद पटेल यांनी 44 मते मिळवत अर्ध्या मताने विजय मिळवला होता. या विजयानंतर अहमद पटेल यांनी ट्विटरवरून सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली होती. "ही निवडणूक माझ्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात अवघड निवडणूक होती. बऱ्याच निवडणुका लढवल्या मात्र एवढे आव्हान कधी मिळाले नव्हते. भाजपाकडून मला पराभूत करण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारने मला पराभूत करण्यासाठी कंबर कसली होती. त्यांचा यामागे काय हेतू होता हे माहीत नाही." असे अहमद पटेल म्हणाले होते.
काँग्रेस पक्षाकडून निलंबित करण्यात आलेले 8 आमदार हे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांच्या जवळचे समजले जातात. शंकरसिंह वाघेला राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानं काँग्रेसच्या आमदारांची मतं फुटण्याची भीती निर्माण झाली होती.