- शीलेश शर्मानवी दिल्ली : बिहारसह देशातील पोटनिवडणुकीत काँग्रेसला फारसे यश न मिळाल्याने पक्षाचे नेते काळजीत आहेत. मध्यप्रदेशात कमलनाथ आणि दिग्विजय सिंह हे मोठे दावे करीत होते. मात्र, तेथेही मोठे यश मिळालेले नाही.
गुजरातमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतरही काँग्रेस काही परिवर्तन करू शकली नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध रोज हल्लाबोल करीत होत्या. तिथे काँग्रेसला केवळ ८ टक्के मते मिळाली आहेत, तर सपा आणि बसपाला काँग्रेसपेक्षा चांगले यश मिळाले आहे. बसपाला १८ टक्के, तर, सपाला २५ टक्के मते मिळाली आहेत.
निवडणुकांमध्ये वारंवार पराभव होत असल्याने काँग्रेस नेत्यांना हे समजत नाही की, त्यांच्या रणनीतीत काय चूक होत आहे. बिहारमध्ये २०१५ मध्ये २७ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा २० ते २१ जागा मिळत आहेत. काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनविण्यासाठी चर्चा सुरू असताना निवडणुकांचे हे निकाल आले आहेत.
पक्षाच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पक्ष सतत निवडणुका हरत आहे. राजस्थान, पंजाबमध्ये पक्ष अशोक गेहलोत, सचिन पायलट आणि कॅ. अमरिंदर सिंग यांच्यामुळे सत्तेत आला होता, तर मध्यप्रदेशातील परिस्थिती सत्तारूढ पक्षाविरुद्ध होती. या नेत्याने असेही सांगितले की, जोपर्यंत पक्ष योग्य मंथन आणि तळागाळात काम करीत नाही तोपर्यंत निवडणुका जिंकणे शक्य नाही.