Congress Complaint Against BJP : कर्नाटक भाजपाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओवरून राज्यात वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओबाबत काँग्रेसने भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, पक्षाचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय आणि कर्नाटक भाजपा अध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
व्हिडीओमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राहुल गांधी यांचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेसने म्हटले आहे की, भाजपा कर्नाटकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कथितरित्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या (एससी-एसटी) लोकांना धमकावले आहे की, त्यांनी एखाद्या विशिष्ट उमेदवाराला मतदान करू नये. एससी/एसटी समुदायाच्या सदस्यांविरुद्ध शत्रुत्व, द्वेष आणि दुर्भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने असे करण्यात आले आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना व्हिडिओमध्ये ॲनिमेटेड पद्धतीने दाखवण्यात आले आहे. जे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे. इतकंच नाही तर दोन्ही नेत्यांच्या मदतीने असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, काँग्रेस पक्ष एका विशिष्ट धर्माच्या लोकांची बाजू घेत आहे आणि एससी/एसटी आणि ओबीसी समाजाच्या सदस्यांना दडपत आहे.
कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे मीडिया आणि कम्युनिकेशन हेड रमेश बाबू यांनी हे पत्र लिहिले आहे. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी भाजपाने पोस्ट केलेल्या व्हिडिओचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. तसेच, असा व्हिडीओ अपलोड करण्याची परवानगी कशी दिली, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. भाजपा आणि अमित मालवीय नेहमीच अशा द्वेषपूर्ण पोस्ट टाकत असतात, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, कर्नाटक भाजपाने शनिवारी (४ मे) संध्याकाळी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओवरून आता सोशल मीडियावर चांगलाच वाद सुरू आहे.