Congress Files: ४.८२ लाख कोटींचा गोलमाल, भाजपाने प्रसिद्ध केली काँग्रेसच्या सत्ताकाळातील घोटाळ्यांची यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 07:46 PM2023-04-02T19:46:32+5:302023-04-02T19:49:43+5:30
Congress Files: भाजपाने काँग्रेस फाईल्स नावाने एक व्हिडीओ सिरीज प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये भाजपाने यूपीए सरकारच्या काळात झालेल्या मोठ्या प्रमाणावरील घोटाळ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे
राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यातील कथित हितसंबंधांवरून गंभीर आरोप केल्यानंतर आता भाजपानेही आता काँग्रेसवर जोरदार प्रत्यारोप केले आहेत. भाजपानेकाँग्रेस फाईल्स नावाने एक व्हिडीओ सिरीज प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये भाजपाने यूपीए सरकारच्या काळात झालेल्या मोठ्या प्रमाणावरील घोटाळ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. भाजपाकडून ट्विटरवर हा तीन मिनिटांचा व्हिडीओ शेअर करून काँग्रेसच्या काळात एकूण 48,20,69,00,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात झालेला कोळसा घोटाळा, २जी स्कॅम, कॉमनवेल्थ गेम घोटाळा आदींचा उल्लेख करण्यात आला आहे.
भाजपाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसच्या सत्ताकाळात ४८ खर्व, २० अब्ज, ६९ कोटी रुपयांची लूट करण्यात आली. या व्हिडीओमध्ये कोळसा घोटाळ्यापासून, २-जी घोटाळ्यापर्यंतच्या सर्व घोटाळ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. ४८ खर्व, २० अब्ज, ६९ कोटी रुपये हे देशाच्या सुरक्षेपासून विकासयोजनांपर्यंत विविध कामांसाठी वापरता आले असते. एवढ्या पैशांमध्ये २४ आएयएनस विक्रांत, ३०० राफेल विमाने आणि एक हजार मंगळ मोहिमा आखता आल्या असत्या. काँग्रेसने केलेल्या घोटाळे आणि भ्रष्टाचाराची किंमत देशाला मोजावी लागली. आपला देश प्रगती आणि उन्नत्तीच्या मार्गावर काँग्रेसमुळे पिछाडीवर राहिला, असा आरोपही भाजपाने केला.
दरम्यान, या व्हिडीओच्या अखेरीस काँग्रेसच्या घोटाळ्यांची ही केवळ झलक आहे. संपूर्ण पिक्चर अजून बाकी आहे, काँग्रेस म्हणजे करप्शन च्या पुढच्या भागात पाहा, पेंटिंगची किंमत २ कोटी रुपये होती. त्या दोन कोटी रुपयांसाठी गांधी कुटुंब धमकीही देत होतं, असा आरोपही भाजपाकडून करण्यात आला आहे.