नवी दिल्ली : आयकर विभागाने कर परताव्यातील कथित तफावतीबद्दल १,८२३.०८ कोटी रुपये भरण्यासाठी काॅंग्रेसला नव्याने नोटीस बजावल्या. मात्र, भाजपला अशाच प्रकरणात ४,६१७ कोटी रुपयांचा दंड होऊ शकत असतानाही त्याकडे सोयीस्कर डोळेझाक केली, असा आरोप काँग्रेसने शुक्रवारी केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खाती गोठवण्यात आल्याने निधीच्या तुटवड्याला सामोरे जात असलेल्या काँग्रेससाठी आयकरच्या या नव्या नोटीस धक्का मानला जात आहे.
ज्या मापदंडांच्या आधारे काँग्रेसला नोटीस बजावण्यात आल्या, त्याच मापदंडाच्या आधारे भाजपकडूनही ४,६०० कोटींहून अधिक रकमेची मागणी करायला हवी, असा दावा पक्षाचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी केला. काल आम्हाला आयकर विभागाकडून १,८२३.०८ कोटी रुपये भरण्यासाठी नोटीस मिळाल्या आहेत. काँग्रेस आर्थिकदृष्ट्या पंगू होत आहे. निवडणुकीपूर्वी समान संधी हिरावून घेण्यासाठी हे सर्व केले जात आहे, असेही माकन म्हणाले.
काँग्रेसची आज, उद्या देशव्यापी निदर्शने : पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेसच्या सर्व राज्य घटकांना शनिवारी आणि रविवारी नव्या नोटीसविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यास सांगितले आहे.
भाकप, तृणमूल यांनाही नोटिसाकाँग्रेसपाठोपाठ भारतीय कम्युनिस्ट पार्टीला (भाकप) आयकर विभागाकडून नोटीस मिळाली आहे. त्यात कर परतावा भरताना जुने पॅनकार्ड वापरल्याबद्दल ११ कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. या नोटीसला आव्हान देण्यासाठी डावे पक्ष वकिलांचा सल्ला घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
७२ तासांत ११ नोटिसा मिळाल्या : तृणमूलपक्षाला गेल्या ७२ तासांत आयकर विभागाकडून ११ नोटिसा मिळाल्या आहेत, असे तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी म्हटले. वसुली नियमानुसारच : काँग्रेसकडून १३५ कोटी रुपयांच्या वसुलीचे समर्थन करताना आयकर विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, नियमानुसारच ती रक्कम आकारण्यात आली आहे. काँग्रेसने २०१८-१९ या आर्थिक वर्षात निवडणुकीत मोठ्या प्रमाणात रोख रकमेचा वापर केल्यामुळे पक्षाने आयकरातील सवलतीचा लाभ गमावला, असे सूत्रांनी म्हटले.
हा ‘कर दहशतवाद’ : रमेशलोकसभा निवडणुकीपूर्वी कर दहशतवादाच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे. भाजपने निवडणूक रोखे घोटाळ्याद्वारे सुमारे ८,२५० कोटी रुपयांच्या देणग्या गोळा केल्याचे संपूर्ण देशाला कळले आहे, असे पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले.१४ लाख रुपये उल्लंघन असल्याचे दाखवून आयकर विभागाने पक्षाच्या बँक खात्यांतून १३५ कोटी रुपये बळजबरीने काढून घेतले आहेत, असे अजय माकन यांनी सांगितले.
आताचे सरकार बदलेल, तेव्हा लोकशाहीचे वस्त्रहरण करणाऱ्यांवर खात्रीने कारवाई केली जाईल. आणि ही कारवाई अशी असेल की, पुन्हा असे काही करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. ही माझी गॅरंटी आहे. - राहुल गांधी, ज्येष्ठ काँग्रेस नेते